शर्जील उस्मानी १८ मार्चला जबाबासाठी हजर राहणार

Sharjeel Usmani
  • गुन्हा रद्द करण्याची सुनावणी अपूर्ण

मुंबई : गेल्या ३० जानेवारी रोजी पुण्यातील एल्गार परिषदेतील (Elgar Parishad) भाषणाने समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप असलेला अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जील उस्मानी (Sharjeel Usmani) याने येता १८ मार्च रोजी जाब  नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांपुढे हजर राहण्याचे आश्वासन उच्च न्यायालयास दिले. ‘भाजयुमो’चे सचिव प्रदीप गावडे यांनी केलेल्या फिर्यादीवरून त्या भाषणाबद्दल डेक्कन जिमखाना पोलिसांनी उस्मानी याच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ ए अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

तो रद्द करण्यासाठी उस्मानी याने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली तेव्हा शर्जीलचे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई म्हणाले की, शर्जील ते भाषण केल्याचा इन्कार करत नाही. फक्त त्या भाषणाने कलम १३ए चा गुन्हा घडला आहे का, एवढाच प्रश्न आहे. शर्जीलने त्या भाषणात काही कठोर शब्द वापरले आहेत, हे खरे. पण संपूर्ण भाषणाचा एकत्रित विचार करावा लागेल. यानंतर न्या. शिंदे  शर्जीलच्या भाषणाचा इंग्रजी तर्जुमा वाटू लागले. त्यात त्यांना शर्जीलने न्यायसंस्थेवर आपला विश्वास नसल्याचे व देशात युद्धसदृश परिस्थिती असल्याचे म्हटले असल्याचे दिसले.

ते अ‍ॅड. देसाई यांच्या निदर्शनास आणत न्यायमूर्ती म्हणाले, विधिमंडळ, कार्यपालिका व न्यायसंस्था हे लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत; शिवाय माध्यमे हा चौथा स्तंभ आहे. आम्ही (न्यायसंस्था) टीकेचे स्वागत करतो. अ‍ॅड. देसाई म्हणाले की, संपूर्ण भाषण वाचून त्यातून कोणता संदेश दिला गेला? ते कोणाला उद्देशून केले गेले व त्याचा संदर्भ काय होता, हे सर्व बारकाईने पाहावे लागेल. अशा प्रकारे संपूर्ण भाषणाचा विचार करण्यासाठी बराच वेळ लागेल. तेव्हा न्यायालयाने त्यासाठी सुनावणी नंतर कधी तरी ठेवावी, असे त्यांनी सुचविले.

अ‍ॅड. देसाई यांनी असेही सांगितले की, गेल्या तारखेला शब्द दिल्याप्रमाणे शर्जील ठरल्या दिवशी स्वत:हून पोलिसांपुढे हजर झाला होता. यापुढेही तो तपासात पूर्ण सहकार्य देत राहील. यावर न्यायालयाने सहायक पब्लिक प्रॉसिक्युटर जे. पी. याज्ञिक यांना विचारले की, उस्मानीला तपासासाठी पुन्हा बोलवावे लागणार आहे का? आणि तोपर्यंत त्याच्यावर सक्तीची कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगायला तुम्ही तयार आहात का? उस्मानीला पुन्हा बोलवावे लागणार आहे, असे याज्ञिक  म्हणाले. मात्र सक्तीची कारवाई न करण्याविषयी ठोसपणे काही न सांगता ते म्हणाले की, अटक  करायचीच झाल्यास तपासी  अधिकारी सर्व नियमांचे पालन करतील, एवढेच मी सांगू शकतो. त्यानंतर उस्मानीने येत्या १८ मार्च रोजी पोलिसांपुढे हजर राहावे, असे ठरले. दरम्यान माध्यमांमध्ये कोणतीही विधाने न करण्याचेही त्याला सांगण्यात आले. पुढील सुनावणी २२ मार्च रोजी होईल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER