शरद पवारांचा शब्द शिवसेनेच्या मंत्र्यानेही पाळला, घेतला हा मोठा निर्णय

Sharad Pawar

सातारा : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना आणि साखर कारखानदारांना कोविड रुग्णालय उभारण्याचे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार अनेक राज्यकर्त्यांनी आणि कारखानदारांनी त्यांना सादही दिली. मात्र आत चक्क शिवसेनेच्या मंत्र्याने पवारांच्या शब्द पाळला आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आपल्या दौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑक्सिजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात कारखाना कार्यस्थळावर हे कोरोना केअर सेंटर सुरु होईल, अशी माहिती देसाई यांनी दिली.

पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने कराड व सातारा येथे रुग्णांना पाठविणे गैरसोईचे होत आहे. त्यामुळे पवारांनी केलेल्या आवाहानुसार देसाईंच्या विशेष प्रयत्नातून ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय प्रत्यक्षात सुरु झाले आहे.

पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहात ऑक्सिजनसह २५ बेडचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचनाही त्यांनी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पाटण येथील वसतीगृहात २५ बेडच्या कामांला तालुका प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हे सेंटर रूग्णांच्या सेवेत आणण्यात येणार आहे.

सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ३०० बेडचे जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मागणी करताच त्यांनी तात्काळ यास मान्यता दिली होती. त्यानुसार शिवाजी संग्रहालयात जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटरच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे.

पाटण तालुक्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या व कराड तसेच सातारा येथे पाटण तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड मिळत नसलेले लक्षात घेता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना कार्यस्थळावर तातडीने ऑक्सिजनसह ५० बेडचे कोरोना सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER