
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी नवी मुंबईत सगळ्याच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेले ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यापुढे यावेळी मोठे आव्हान आहे. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश नाईक (Ganesh Naik) यांना धक्का दिला. नाईक समर्थक नगरसेविका दिव्या गायकवाड व त्यांचे पती माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी नाईक कुटुंब भाजपासोबत असून सध्या सुरू असलेली राजकीय उलथापालथ लक्षात घेता महापालिकेत वर्चस्व कायम राखणे हे गणेश नाईक यांच्यापुढे आव्हान आहे. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असताना राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी गणेश नाईक यांना लागोपाठ धक्के दिले आहेत.
गणेश नाईक यांचे खंदे समर्थक असलेल्या नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले आहे आणि नवीन गवते यांच्या शिवसेना प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. नाईक समर्थक तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असताना आता वाशीतील नगरसेविका दिव्या गायकवाड आणि त्यांचे पती माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनी या दोघांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला