‘पश्चिम महाराष्ट्रानंतर आता पवारांचे मिशन कोकण’!

SHarad Pawar.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पश्चिम महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेचा (Shiv Sena) गड समजल्या जाणाऱ्या कोकणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोकणातील (Konkan) रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना त्यांनी मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना केली आहे.या माध्यमातून त्यांनी कोकणात राष्ट्रवादीचे पायमुळे घट्ट बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटीव्ह’ संशोधनासाठी अनुकूल वातावरण व क्षमता आहे. हे लक्षात घेऊन कोकण विभागास आंतरराष्ट्रीय नवोन्मेष (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात मुंबईतील राज्य सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

शरद पवार यावेळी म्‍हणाले, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे. कोकणात त्यासाठी अनुकूल वातावरण आहे. कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत.

कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER