शरद पवारांचे महिलांच्या सबलीकरणात मोठं योगदान; नातू रोहित पवारकडून स्तुतिसुमने

Rohit Pawar - Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 80 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक निर्णय घेतले. महिलांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला, अशी पोस्ट शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लिहिली. महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचे मोठं योगदान आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले .

रोहित पवारांची पोस्ट :
आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या ८० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत असे अनेक निर्णय घेतले, ज्याचा प्रभाव दीर्घकाळ राहीलच पण सामाजिक जडणघडणीत हे निर्णय एक मैलाचा दगड ठरतील, असा मला विश्वास आहे.

स्त्री सशक्तीकरण हा फक्त बोलण्याचा शब्द नाही तर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याची किमया कुणी केली असेल तर ती पवार साहेबांनी. महिलांना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवू शकतात, यावर साहेबांचा पहिल्यापासून विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच त्यांनी महिलांना राजकारण, समाजकारणात बरोबरीने संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1993 साली पवार साहेबांनी देशात पहिल्यांदा राज्यात महिला धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद केली गेली, आज ती 50% पर्यंत वाढलीय.

महिला आणि बालविकासासाठी जिल्हा परिषद पातळीवर वैधानिक समिती निर्माण करुन या समितीचं अध्यक्षपद महिलांकडेच राहील याची काळजी घेतली. या धोरणामुळं समाजात अनेकांना धक्के बसणार होते, पण त्यामुळं काही नुकसान होणार नाही यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती केली. महिला आणि बालकल्याण हे खाते वेगवेगळे केले. महिला कल्याण सक्षमीकरणाची संकल्पना घेऊन सुरू झालेला हा विचार पवार साहेबांच्या प्रयत्नांमुळे महिला विकासाला चालना देणारा ठरला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला भगिनी मोठ्या हिमतीने गावगाड्यापासून शहरापर्यंतचा कारभार हाकतात. त्यामुळं राज्यातील स्त्रियांसाठी पवार साहेबांनी एक नवा जाहीरनामाच लिहिला, असे म्हणलं तरी ते चुकीचे ठरणार नाही..!, असे पोस्ट रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER