शरद पवारांचा गेम फसतोय

badgeविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी स्पर्धा लागली आहे. दोन्ही पक्ष युतीत लढत असले तरी कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. मागे शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा जाहीर करताच भाजपने रथयात्रेची घोषणा केली. शिवसेना आणि भाजप हे शहरी पक्ष आहेत, असे पूर्वी हिणवले जायचे. आता ती परिस्थिती नाही. मुंबईपुरता विचार करणाऱ्या शिवसेनेने यावेळी शेतकऱ्यांना टार्गेट करण्याचे योजिले आहे. विमा योजनेत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर शिवसेनेने आक्रमक होण्याचे ठरवलेले दिसते. हा विषय घेऊन शिवसेनेने येत्या १७ जुलै रोजी मुंबईत विमा कंपनीच्या मुख्यालयावर मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. विमा कंपन्या शेतकऱ्यांना पुरेशी नुकसानभरपाई देत नाही ही ओरड आहे. काँग्रेसच्या राज्यातही ही ओरड होती आणि युती सरकारच्या पाच वर्षांत  त्यात काही फरक पडला नाही. आता निवडणूक तीन महिन्यांवर  आली असताना शिवसेना मोर्चा ठेवते आहे; पण मित्रपक्ष भाजपला सोबत घेत नाही याचा काय अर्थ लावायचा? युती आहे म्हणून दोघांनी साऱ्याच गोष्टी एकत्र करायच्या हे अपेक्षित नाही. आषाढी एकादशीनिमित्त विठोबाच्या महापूजेतही युती दिसणार अशा बातम्या होत्या; पण आता केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूजा करणार असे दिसते. सहा महिन्यांआधीची तंग परिस्थिती युतीत नाही. मनोमिलन आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार भेटताना दिसत आहेत. सारे आलबेल आहे; पण दोघांनीही आपली व्होट बँक वाढवण्याची धडपड चालवलेली दिसत आहे. येत्या निवडणुकीत ‘शेतकरी संकट’ हाच कळीचा मुद्दा असणार आहे. ते हेरून शिवसेना कामाला भिडली आहे. त्यामुळे शरद पवार यांचा गेम फसताना दिसतो आहे. शेतकरी हा परंपरेने दोन्ही मतदार राहात आला; पण आता युतीने तो पळवला आहे. युतीने आरक्षण मिळवून दिल्याने उरलेसुरले मराठेही तंबू सोडून पळत
आहेत. त्यामुळे आपल्याला कोण मतं देणार अशा काळजीत शरद पवार लोटले गेले आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपला देशात ३१ टक्के मतं मिळाली होती. २०१९च्या निवडणुकीत भाजपने ३७ टक्के मतं घेतली. म्हणजे सहा टक्के जास्त मतं घेऊनही अमित शहा-नरेंद्र मोदी जोडीचे समाधान झालेले दिसत नाही. नवे सदस्य बनवण्याची जोरदार मोहीम भाजपने हाती घेतली आहे. तिच्या बैठकीसाठी ह्या मोहिमेचे राष्ट्रीय प्रमुख शिवराजसिंह चव्हाण आज नागपुरात होते. आणखी पाच वर्षे  मोठी निवडणूक नसताना भाजप सक्रिय होतो याचे रहस्य महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. झारखंड, हरियाणा आणि पुढे दिल्लीतही निवडणूक आहे. ह्या निवडणुकांमध्ये तरुण मतदार भाजपचा टार्गेट आहे. नरेंद्र मोदींना क्षणाचे पंतप्रधान पण अखंड काळचे निवडणूक प्रमुख म्हणतात, ते उगाच नव्हे.

या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या छावणीत मात्र स्मशानशांतता दिसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेसच्या नेत्यांनी काहीही धडा घेतलेला दिसत नाही. दोन्ही काँग्रेस गलितगात्र आहेत. राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार अधूनमधून आपल्या अस्तित्वाचा परिचय देतात; पण पश्चिम महाराष्ट्र हातचा निसटल्याने राष्ट्रवादीची आता कोंडी सुरू आहे. अजितदादा पवार सोडले तर राष्ट्रवादीच्या कुण्याही नेत्याला निवडून येण्याची गॅरंटी नाही. दीड महिना उलटूनही राहुल गांधींची रिकामी जागा भरता आलेली नाही. राष्ट्रीय अध्यक्षच नसल्याने राज्यात सारेच अस्थिर आहे. प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे यांना सोबत घेण्याचाही कुणात उत्साह दिसत नाही. प्रचंड मरगळ आली आहे. आपला अवतार संपला याची खात्री झाल्याने अशोक चव्हाण दुरून गंमत पाहात आहेत. मुंबईत लोकसभेच्या सहाही जागा काँग्रेसने गमावल्या. आता विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्या जिंकण्यासाठी तरी भिडायला पाहिजे होते; पण भांडणातच मुंबईच्या नेत्यांचा सारा वेळ जातो आहे. मुरली देवरा आणि संजय निरुपम यांची भांडणे मीडियाच्या मसाल्याचा विषय बनली आहेत. ‘हम तो डुबेंगे सनम, आपको भी ले डुबेंगे’ असा हा मामला आहे.