शरद पवारांचे प्रिय आमदार निलेश लंकेनी कोरोना रुग्णांसोबत घेतली विनामास्क सेल्फी

Nilesh Lanke Taking A Selfie With Coronavirus Patient

अहमदनगर : ‘मी जबाबदार! माझा मास्क माझी सुरक्षा,’ असे सांगत खुद्द मुख्यमंत्री आणि राज्य सरकार नागरिकांना मास्क वापरासंबधी आवाहन केले आहे . मास्क न वापरणाऱ्यांना प्रशासनाकडून दंड केला जात आहे. असे असूनही पारनेरचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मात्र रुग्णालयात उपचार सुर असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. ‘मी असुरक्षित असलो तरी चालेल माझी जनता मात्र सुरक्षित असली पाहिजे, असे सांगत लंके यांनी ही भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्यांच्यासह इतरांचाही जीव धोक्यात घातल्याचे दिसून येते.

तालुक्यातील सुपे येथील एका खासगी कोरोना रुग्णालयास आमदार लंके यांनी भेट दिली. त्यावेळी तेथील डॉ. बाळासाहेब पठारे हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. यादरम्यान कोरोनाची लक्षणे असलेल्या तसेच श्‍वसनाचा अधिक त्रास होत असलेल्या रुग्णांची लंके यांनी थेट त्यांच्या खाटांजवळ जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. काही ठिकाणी रुग्णांनी त्यांचे सेल्फी घेतले तर काही ठिकाणी स्वत: लंके यांनीही रुग्णांसोबत सेल्फी घेतले.

कोरोना (Corona) बाधितांच्या जवळ जाण्यास त्यांच्या नातेवाईकांनाही मनाई आहे. अशा परिस्थितीत आमदारांनी थेट जवळ जाऊन भेट घेतली. तेही पीपीई कीट आणि साधा मास्कही न लावता. लंके यांच्या या ‘धाडसाचे’ त्यांच्या समर्थकांकडूनही कौतुक होत आहे. मात्र, आरोग्य आणि सरकारी नियमांच्या विरोधात त्यांची ही कृती असल्याचे दिसून येते. भेट घेऊन दिलासा द्यायचा असेल तर सुरक्षेसंबंधी योग्य ती काळजी घेऊन जाता आले असते, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER