‘लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्या !’ शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Sharad Pawar and CM Uddhav Thackeray

मुंबई :- शिवसेना भाजपमधून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासूनच या तीन पक्षांच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. कोरोनाच्या संकटात सुरुवातीला हे चित्र धूसर झाले होते. मात्र, आता विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून पुन्हा महाविकास आघाडीत बेबनावाचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. आतापर्यंत कॉंग्रेसचेच मंत्री नाराज असल्याचे दिसत होते, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनीही कॉंग्रेसच्या सुरात सूर मिसळलेला पाहायला मिळत आहे.

अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परस्पर घेतलेला निर्णय शरद पवारांना रुचला नाही. म्हणूनच ठाकरेंच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पवारांनी लगेच उद्धव ठाकरेंची भेट घेतली व त्यांना समजुतीचे दोन शब्द सांगितले, असे सूत्रांनी सांगितले आहे.

तसेच, राष्ट्रवादी मंत्र्यांच्या नाराजीबाबत सावध करताना शरद पवार यांनी ठाकरेंना मोलाचा सल्लादेखील दिला आहे. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनसह इतर निर्णय घेताना प्रशासनाला विश्वासात घेणे चांगलेच आहे; परंतु लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुक्रवारच्या भेटीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दादरच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात दोन नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

मंत्र्यांना न विचारताच लॉकडाऊन कडक करण्याच्या निर्णयामुळे काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचे मंत्रीही नाराज आहेत. याबाबतच पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

त्याआधी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती. या बैठकीत लॉकडाऊनबाबतचा गोंधळ दूर केला जाईल आणि अनलॉकसाठी पावले उचलताना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेत निर्णयांमध्ये एकसूत्रता आणली जाईल, असे ठरल्याचे समजते. सदर वृत्त लोकमतने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER