शरद पवारांनी ४० गोष्टी लिहिल्या आणि ३८ पूर्णही केल्या !

Sharad Pawar

मुंबई : मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी ४० गोष्टी लिहून काढल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्या पूर्ण केल्या. शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाले. या तीन टर्ममध्ये त्यांनी ४० पैकी ३८ गोष्टी पूर्ण केल्या होत्या. त्यांच्याकडे व्हिजन होतं. असं व्हिजन उद्धव ठाकरे यांच्याकडं आहे का? हे पूर्ण व्हिजन अजित पवारांकडे आहे का?- असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. “शरद पवारांकडे अजेंडा होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अजेंडा होता. तसा उद्धव ठाकरेंकडे नाही. ” असा दावा पाटील यांनी केला.

ते लोकसत्ता ऑनलाईनशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका जवळपास उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घेत असतात. याविषयी आपण काय सांगाल, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “मी बघितले नाही, पण काय होत असेल याची मी कल्पना करू शकतो. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचा अजेंडाच नाही. त्यामुळे मला त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करायला आवडेल. मला माझा पक्ष आहे. त्यांना त्यांचा पक्ष आहे.

शिवसेना उपतालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

उद्धव ठाकरे यांनी मला रजिस्टर सावकारी आणि सावकारी यातील फरक सांगावा. हे तुम्हाला माहिती नसतं, तेव्हा तुमच्या डोक्यात अजेंडाच नसतो की सावकारी संपवायची आहे. असं डोकं अजित पवारांचं चालतं. जसं देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात आलं की, अनाथ मुलांना आरक्षण असलं पाहिजे. यासाठी अजेंडाच लागतो.” असं पाटील यांनी सांगितलं. तसेच असा अजेंडा शरद पवार यांच्याकडे होता, असे दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी आम्हाला सांगितलं होतं. शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी ज्या ४० गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यातल्या ३८ गोष्टी पूर्ण केल्या, असे म्हणून पाटील यांनी पवारांच्या कार्यांची दखल घेतली तर उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.