राजकारण्यांनी भान ठेवावं, शरद पवार हे धनंजय मुंडेंबाबत योग्य निर्णय घेतील – संजय राऊत

Sharad pawar-Dhananjay Munde-sanjay raut

मुंबई :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde)यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना धनंजय मुंडेंच्या बचावासाठी पुढे आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांना चिमटे काढले. खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असे विधान संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब आहे. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये.

धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) अनुभवी आणि प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत शरद पवार योग्य निर्णय घेतील, असे संजय राऊत यांनी भेटले.

यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करुन दिली होती. तेव्हादेखील गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘राजकारणात शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे’ कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळे एका क्षणात चिखलफेक करुन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही ही गोष्ट शिकलो आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या घडामोडीवरही भाष्य केले. केंद्राला वाटतंय की शेतकरी आडमुठे आहेत, शेतकऱ्यांना वाटतंय सरकार आडमुठेपणा करतंय, कायदे न्यायालयाने बनवलेले नाहीत, ते सरकारने तयार केले आहेत. सरकारने शेतकऱ्यांकडे एक पाऊल पुढे टाकावं, त्यामुळे सरकारवर आभाळ कोसळणार नाही, असेही खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : पवार आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत आज निर्णय घेण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER