दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार वाढदिवस साजरा करणार नाहीत

Sharad Pawar

मुंबई :- राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या 12 डिसेंबरला असलेला आपला वाढदिवस साजरा न करण्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले आहे त्याऐवजी दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही कार्यकर्त्यांना केले आहे.

शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही समारंभ न घेता आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसभेचे अधिवेशन सुरु असतानाही शरद पवार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याचठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा द्याव्यात असेही आवाहन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले आहे