शिवसेनेची आज कसोटी; सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांची साथ मिळणार ?

Sharad Pawar will get support shivsena for establishing Govt

मुंबई : लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा नव्या वळणावर आला आहे. भाजपानं आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला आमंत्रण दिलं असून, आजचा दिवस शिवसेनेसाठी कसोटीचा ठरणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा शिवसेनेकडं नाही. त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरच शिवसेनेला सत्तास्थापन करता येईल .

ही बातमी पण वाचा:- संभाव्य सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुखयमंत्री तर, अजित पवार उपमुख्यमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे शिवसेनेला पाठिंबा देणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे .

सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडं आजचा दिवस असून, शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. दुसरीकडं शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून काँग्रेसमध्ये विचारविनिमय सुरु आहे .

दरम्यान राष्ट्रवादीही शिवसेनेस पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं दिसून येत आहे. मात्र, पाठिंबा हवा असल्यास शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर पडावं लागेल अशी अट राष्ट्रवादीनं घातली आहे. दोन्ही काँग्रेससोबत तडजोडी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेत असल्याची माहिती आहे .