पवारांना करायचे आहे सुप्रियाला मुख्यमंत्री !

Sharad Pawar-Supriya sule

Badgeराष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार लोकसभा निवडणूक आटोपताच विधानसभा निवडणुकीच्या कामाला भिडले आहेत. कुठल्याही परिस्थितीत या वेळी त्यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना  मुख्यमंत्री झालेली पाहायचे आहे. बारामती लोकसभेचा निकाल काहीही लागो, महाराष्ट्राला त्यांना पहिली महिला मुख्यमंत्री द्यायची आहे.

पवारांच्या मनातले कुणाला कळत नाही; पण दुष्काळी दौऱ्याच्या हिशेबाने त्यांचे डावपेच सुरू झाले आहेत. दुष्काळी दौऱ्यात एका शेतकऱ्याने ‘धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री करा’ अशी विनंती पवारांना केली.  तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेने सारेच गोंधळात पडले होते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी कुटुंबातील सुप्त संघर्ष उफाळून येऊ नये याची काळजी ते घेत आहेत. नातू पार्थला लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांनी पहिला अडथळा दूर केला. आता दुसरा नातू रोहित याला विधानसभा देण्याची तयारी त्यांनी चालवली आहे.

ही बातमी पण वाचा : चार आमदारांचे राजीनामे मंजूर

राष्ट्रवादी भारी पडली तर अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. आपल्याला डावलले जाते आहे अशी थोडीही शंका आली तर अजितदादा गडबड करू शकतात. तसे झाले तर राष्ट्रवादी फुटू शकते. ही सारी गणितं लक्षात घेऊन शरद पवार ताकही फुंकून पीत आहेत. ऐनवेळी ते आपले पत्ते खुले करतील अशी राष्ट्रवादीच्याच आमदारांमध्ये चर्चा रंगते आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागतो त्यावर सारी समीकरणे अवलंबून आहेत. गेल्या वेळी काँग्रेसला दोन  तर राष्ट्रवादीला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले होते; पण यावेळी दोन्ही काँग्रेसची आघाडी २० जागांपर्यंत पोचू शकते अशी कबुली भाजपचेच नेते खासगीत देत आहेत. ग्रामीण भागातल्या सरकारविरोधी वातावरणाचा आम्हाला अंदाज आला नाही, असे भाजपच्या एका नेत्याने मान्य केले. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. आघाडी २० जागा घेणार असेल तर उरलेल्या २८ जागा कोण जिंकणार, ह्या प्रश्नाचे उत्तर कुणालाही सापडत नसल्याने सारेच पक्ष अंधारात चाचपडत आहेत. लोकसभेचे निकाल उलटे लागले तर राज्यात भाजप दुबळा होऊन पवार बाहुबली होतील. सहा महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून आणून ‘मिशन सुप्रिया’ पूर्ण करण्याचे ‘जाणता राजा’चे मनसुबे पाहता महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथी होऊ घातल्या आहेत. पुन्हा मोदींचे सरकार आले तर पवार राज्यात काँग्रेससोबत जातीलच याची शाश्वती देता येत नाही, असे त्यांच्याच एका ज्येष्ठ सहकाऱ्याने कबूल केले.

ही बातमी पण वाचा:- कौन बनेगा पंतप्रधान ? निकालाआधीच भांडणं