गोपीचंद पडळकरांना आसमान दाखवण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा वापरलं जुनं शस्त्र!

sharad-pawar-used-old-weapon-again-to-answer-bjp-gopichand-padalkar

जेजुरी : शनिवारी जेजुरी गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar)यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मात्र या कार्यक्रमाआधी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आपल्या समर्थकांसह जेजुरी गडावर येऊन पुतळ्याचं अनावरण केलं. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं.

नियोजित कार्यक्रमाआधी पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्याबाबत शरद पवार काय बोलणार, याची जनतेला उत्कंठा होती. मात्र शरद पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर ‘हल्ला’ करण्यासाठी आपलं जुनंच शस्त्र वापरलं. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष उलटून गेली आहेत. यादरम्यान पवार यांच्यावर अनेकदा सणसणाटी आरोप झाले तर कधी विखारी टीकाही झाली. मात्र या सगळ्यांवर पलटवार करण्याऐवजी शरद पवार एकच शस्त्र वापरत राहिले. कितीही आरोप झाले आणि टीका झाली तरी त्याचा उल्लेखच न करता समोरच्या व्यक्तीला अनुल्लेखाने मारणे, हेच ते पवारांचं हुकमी अस्त्र. जेजुरीत आज झालेल्या कार्यक्रमातही शरद पवार यांनी हेच अस्त्र वापरत गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा उल्लेख केलाच नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले गोपीचंद पडळकर हे वारंवार शरद पवार यांच्यावर आक्रमक टीका करताना दिसून येतात. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत…ते जातीयवादी आणि भ्रष्टाचारी आहेत,’ अशी जहरी टीका असो वा त्यांच्या नियोजित कार्यक्रमाआधी घातलेला गोंधळ. गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली नवी राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. शरद पवार हेच आपलं लक्ष्य असणार, हे गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

शरद पवार यांच्यावर टोकदार टीका करत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांच्याकडून केला जात असल्याचं दिसत आहे. आगामी काळातही ते याच भूमिकेतून राजकारण करतील, अशीही दाट शक्यता आहे. त्यामुळे पडळकर यांच्या या राजकीय शैलीला यश येतं की राजकारणाच्या मैदानात जुने खेळाडू असलेले शरद पवार गोपीचंद पडळकर यांचा हा प्रयत्न हाणून पाडत त्यांना आसमान दाखवणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER