पवारांचा सल्ला मुख्यमंत्र्यांना मान्य, शेतकरी आंदोलनात सहभागी न होण्याचा घेतला निर्णय?

CM Uddhav Thackeray-Sharad Pawar

मुंबई : मागील ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना  पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन (farmers-march) सुरू झालं आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सहभागी होणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असा सल्ला शरद पवार यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे. आता खुद्द शरद पवारांनीच सल्ला दिल्यामुळे मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सहभागी होण्यावर निर्णय झाला आहे.

मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय मुंबईत कोरोनाचं संकटही आहे. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने इतर पक्षाचे मत विचारात न घेता केवळ बहुमताच्या जोरावर कृषी कायदे संसदेत मंजूर करवून घेतले. कोणताही कायदा मंजूर करताना त्यावर चर्चा करायची असते. पण चर्चा न करताच केंद्र सरकारने हा कायदा मंजूर केला. शेतकऱ्यांची बाजू जाणून घेण्याची गरज होती. केंद्राने ते केलं नाही. त्यामुळे एवढं वादंग माजलं आहे, असंही पवारांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आझाद मैदानातील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे मोर्चात येणार असल्याने त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER