लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार : शरद पवार

Sharad Pawar

पंढरपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे , अशी इच्छा पक्षाच्या नेत्यांनी नेत्यांनी वर्तविली आहे . त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करुन दोन दिवसात उमेदवारीबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं. सांगोल्यात सुरु असलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते.

आजच्या परिषदेत शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा केली . लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सर्व स्तरावर सुरु केली आहे . शरद पवार हे उमेदवार असल्यास त्यांना कोणीच हरवू शकत नाही . तसेच नेत्यांच्या या विनंतीवर शरद पवार नक्कीच विचार करतील , असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वर्तविला आहे .

दरम्यान काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी निवडणूक लढण्याच्या विषयावर प्रतिक्रिया दिली . माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी विजय सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. पण या बाबत विचार करून सांगू, असे त्यांना मी सांगितले, असे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी आज दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटले आहे . यावरून शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे . माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता.

ही बातमी पण वाचा : लोकसभा लढा ; शरद पवारांना पक्षाच्या नेत्यांचा आग्रह

या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती, हे विशेष .

ही बातमी पण वाचा : बारामती जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा – शरद पवार