‘शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊतांनी आग्रह करावा’ – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar & Sanjay Raut

चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) रोखण्यासाठी शरद पवारांचे (Sharad Pawar) नेतृत्व सर्वांनी स्वीकारावं या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मतावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तर वेगवान प्रगती होऊ शकते. कृषी आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा वेगवान प्रगतीत होईल असे सांगत राऊतांनी पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह करावा असे भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते चंद्रपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीलाही लक्ष्य केले.

यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमितीवरुन हटवा अशीही मागणी केली. आरक्षण म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. मूळ प्रश्न सुटले नाही तर अशा पद्धतीने आरक्षणाच्या मागण्या पुढे येत असतात. ज्यांच्याकडे सातत्यानं सत्ता होती त्यांनी मूळ प्रश्न सुटण्याचे नियोजन केले नाही. त्यांना मराठ्यांची चिंता कमी आणि स्वपरिवाराची चिंता अधिक होती असा टोला मराठा आरक्षणासंदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

मागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं ते टिकवणं गरजेचं होतं. आता कोर्टातही जी तयारी आवश्यक होती ती झाली नाही. आणि सर्व वेळ राजकारणात घालवला जात असून प्रश्नावर उत्तर नव्हे तर पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची मदत सरकार का स्वीकारत नाही? त्यांनाही या प्रक्रियेत सामावून घेण्यात काय वावगे आहे? असाही प्रश्न मुनगंटीवार यांनी विचारला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीसविषयी प्रश्न विचारला असता मुनगंटीवार यांनी प्रतक्रिया देण्याचं टाळलं.ईडी ही स्वतंत्र चौकशी यंत्रणा असून त्या नोटीसचा आपल्याला अभ्यास नसल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनंतर तुमचं स्थान काय राहील, अजित पवारांनी त्याचा विचार करावा – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER