राहुल गांधींचे कॉंग्रेसमधील स्थान आणि नेतृत्वाबद्दल शरद पवार म्हणतात…

Rahul Gandhi - Sharad Pawar

मुंबई :- कॉंग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडून राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवल्यानंतर राहुल गांधी यांच्या पक्षातील नेतृत्वाबद्दल अनेकदा प्रश्न उठवले जातात. त्यांना नेहमीच टीकेला सामोरं जावं लागतं. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आल्यानंतर पवार यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या सुमार कामगिरीनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षातील स्थानाबाबत आणि त्यांच्या नेतृत्वाबाबत म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. सोनियाजी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.

यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का, अशी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले की, असे आहे की त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

१२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER