शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चेला उधाण

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई :- पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेले काही दिवस आजारी असल्याने ते घरीच आराम करत होते. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना करावयाची मदत, कोरोनाचं (Corona) संकट, म्युकरमायकोसिसचं संकट, लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षण (Maratha Reservation), पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, या बैठकीचा अधिकृत तपशील स्पष्ट न झाल्याने चर्चेला उधाण आलेले आहे.

मधल्या काळात विविध घटकांतील लोकांनी पवारांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्यांचं निवेदन या घटकांनी पवारांना दिलं होतं. त्यामुळे पवारांनी या घटकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मराठा समाजाला विश्वासात कसं घ्यायचं या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागांचं नुकसान झालं आहे. केंद्राकडून तोकडी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाचे पॅकेज, राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काय करायचं? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. पवारांचं काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झालं. कोरोनाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतही लोकांच्या समस्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे आले. त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे पवारांना माझा सॅल्यूटच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पवार-मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कशाबाबत झाली हे मला माहीत नाही; पण विकासकामांच्या मुद्द्यावर पवार नेहमी भेटतात, त्यानुषंगानेच ही भेट असावी, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : उजनी धरणाच्या पाण्याचा वाद चिघळला, शरद पवारांच्या ‘गोविंद बागे’ची सुरक्षा वाढवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button