शिवसेनेचं “रिमोट कंट्रोल” आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी !

Shivsena-ncp

विजय गावंडे….

नागपूर : वयाच्या वीस वर्षांपासून सार्वजनिक कार्यात जीव ओतून काम करणारे, तेथूनच राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून राज्याचा राजकारणात आपले प्रभुत्व गाजविणारे, आणि राजकीय खेळी खेळून सगळ्यांना धुळीत लोळवणारे मुरब्बी नेते म्हणजे शरद पवार. आज वयाची ८० वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. राजकारण म्हटले की, आपल्यासोबत राजकीय वैर राहणार याची जाणीव पवारांना होतीच. मात्र परिस्थितीनुसार कोणाला जवळ आणि कोणाला दूर करायचे याच कसब शरद पवारांना चांगलेच ठाऊक. आणि हे कसब त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षीही करून दाखवले ते म्हणजे एकेकाळी कट्टर वैरी असलेल्या शिवसेनेला जवळ करून. आणि त्यातही शिवसेनेचं पारंपरिक ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती घेऊन.

राजकारणात कितीही वैर राहो, मात्र संकटकालीन असो अथवा लाभदायक प्रसंग शरद पवार यांनी नेहमीच अश्या प्रसंगांचं सोने केले हे भारतातील सर्वच नेत्यांना अभिभूत आहे. आणि काहीसा असाच प्रसंग आता महाराष्ट्रात उद्भवला आहे. ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती एकत्रित लढली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मोठी लढत युतीने दिली. एकूण २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी – ५४ आणि काँग्रेस- ४४ जागांवर विजयी झाली. राज्यातील जनतेने युतीला दुसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी दिली. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून भाजप आणि शिवसेनेत खटके उडण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्रीपदावर एकीकडे भाजपचे नेते तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेतेही दावे करू लागले. आणि हा वाद इतका विकोपाला गेला की, सत्ता स्थापनेचा दावा तर सोडाच, ३० वर्षांपासून असलेला भाजप-शिवसेनेचा घरोबा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात कोसळला. आणि याचीच वाट बघत असलेल्या शरद पवारांनी संधीच सोनं करण्याचा कार्यक्रम आखला.

कुठल्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने राज्यपालांना नाइलाजास्तव राष्ट्रपती राजवट लावावी लागली. आणि हाच धागा पकडून शरद पवारांनी शिवसेनेच्या वाघाला आपल्या पिंजऱ्याकडे आकर्षित करण्याची योजना आखली. भाजप-सेना युतीचे सरकार येत नसेल तर, राज्याच्या हितासाठी पर्यायी सरकार देऊ, अशी पहिली गुगली राष्ट्रवादीने टाकली. त्यानंतर आधीपासूच बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युती तोडणाऱ्या शिवसेनेनं पवारांशी जवळीक साधून भाजपला मोठा धक्का दिला. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी १४४ आमदारांचे संख्याबळ आवश्यक असल्याने काँग्रेस पक्षालाही सोबत घेणे आवश्यक होतेच. यातही शरद पवारांनी महत्वपूर्ण भूमिका निभावत भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी गळ काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे घातली. मात्र शिवसेनेची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा विपरीत असल्याने सुरुवातीला सोनिया गांधी यांनी शरद पवारांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. मात्र एका दगडात दोन नव्हे तर तीन शिकार करण्यात तरबेज असलेले शरद पवार थांबतील हे शक्यच नव्हते.

मध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा

काँग्रेससोबत बैठकांचा सपाटा लावत शिवसनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता मिळवणे आणि भाजपलाही शिवसेनेपासून दूर करण्याचे महत्व पटवून दिले. आणि शेवटी सोनिया गांधी यांनी काही अटी आणि शर्तीच्या आधारावर शिवसेनेला पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवला. आणि येथूनच सुरु झाली शरद पवारांची मोठी खेळी. शिवसेनेला पूर्ण वेळ मुख्यमंत्री देऊन महत्वाची खाती आपल्या पदरात कशी पडता येईल याचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले आहे. सत्तास्थापनेची चर्चा सुरु असतांनाच शरद पवारांनी नागपुरात एक विधान केले होते. मुख्यमंत्रिपदाची कुणी मागणी केली तर त्याचा विचार केला जाईल. मात्र राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पाच वर्षे चालणारे स्थिर सरकार आणायचे आहे. ते सरकार टिकवण्यासाठी आम्ही स्वतः लक्ष घालू, असं सूचक विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

महिन्याभरापासून सुरु असलेला राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन होणार आहे. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक होती. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला सोबत घेऊन शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. जवळपास तास भर चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय झाला आहे. पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती पुढे येत आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता महाविकासआघाडीचा नवा फॉर्म्युला पुढे येत आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं तर काँग्रेसला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला २७ महामंडळे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी २५ महामंडळे मिळणार आहेत. तर सिद्धिविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेनेकडे आणि शिर्डी संस्थानचा कारभार काँग्रेस आणि राष्ट्रवादी बघणार आहेत.त्यातही महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे खेचण्यात शरद पवारांना यश मिळाल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद असले तरीही सरकारवरचे संपूर्ण नियंत्रण हे पवारांच्या हाती असणार आहे. त्यामुळे शिवसेनेचं पारंपरिक ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हाती घेण्यात शरद पवार यशस्वी झाले, असे म्हणणे वावगं ठरणार नाही.