शरद पवारांनी सांगितलं कृषी कायद्याला विरोध करण्याचं खरं कारण

Sharad Pawar

पुणे :- दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुनपुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला. वास्तविक पाहता शेती हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे कायदे बनवताना केंद्र सरकारने राज्याचे मत जाणून घेणे आवश्यक होते. परंतु कृषी कायदे बनवताना राज्याशी कोणतीही चर्चा केली नाही. हा राज्याचा विषय असताना केंद्राने परस्पर कायदे केले, ही माझी तक्रार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात बदल होणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्य असेल तिथे बदल करण्याला माझा विरोध नाही. मात्र, त्यासाठी एकत्र चर्चा करुन निर्णय घेण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते रविवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आतापर्यंत शेतकरी आंदोलकांसोबत केंद्र सरकारकडून चर्चा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) हे मुंबई शहरातील रहिवासी आहेत. ते आमचे मित्र आहेत. परंतु पीयूष गोयल यांचं शेतीमधलं संबंध मला माहिती नाही. पीयूष गोयल हे शेतीतज्ज्ञ आहेत हे ऐकून माझ्या ज्ञानात नवी भर पडली,अशी मिस्कील टीका शरद पवार यांनी केली.

कृषी कायद्याबाबत वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 पासून चर्चेला सुरुवात झाली होती. 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो. त्या काळात या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शेती हा घटनेनं राज्याचा विषय. त्यामुळं मी देशातल्या सर्व कृषीमंत्र्यांची बैठक घेतली आणि राज्यासाठी हा कायदा करण्याबाबत सर्वांची मते घेवून एक समिती केली. त्याचा एक मसूदा या समितीमार्फत बनवण्याचा निर्णय झाला. त्याची जबाबदारी त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह नऊ राज्यातील कृषीमंत्री यांच्यावर होती. त्यातून मसूदा तयार करुन तो राज्यांना कळवून त्यावर विचार करण्याबाबत सुचवण्यात आले. त्यानंतर नवीन सरकार आलं. आता फरक असा आहे की नव्या सरकारने थेट कायदाच तयार केला आणि तो संसदेत आणून गोंधळात पास करुन तो अंमलात आणला, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ज्यावेळी चार ते पाच राज्यातील शेतकरी ऊन, पाऊस थंडीमध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करतात. त्यावेळी सरकार संवेदनशील असले पाहिजे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या सारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी, असे शरद पवार यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : सचिनने कधी नाही ते शेतकरी आंदोलनावर ट्विट करून चूक केली? शरद पवारांसह अनेकजण व्यक्त केली नाराजी 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER