दिल्लीत झालेला मरकजसारखा कार्यक्रम महाराष्ट्रात होऊ नये – शरद पवार

sharad pawar

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनेतशी संवाद साधला. यावेळी, पोलीस दलाचं कौतुक करत, सर्वसामान्य नागरिकांकडून लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याचं ते म्हणाले. देशातील ९० टक्के लोक आदेशाचं पालन करत आहेत. पण, १० टक्के लोकांकडून अद्यापही लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं. “दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला आहे. मरकजचा हा कार्यक्रम टाळता आला असता. महाराष्ट्रात असं घडू देऊ नये,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

“दिल्लीत मर्कजच्या आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

फेसबुकवरील संवादावेळी राज्यातील विविध ठिकाणाहून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच काहींनी सूचनाही केल्या. गर्दी पूर्णपणे कमी करण्यासाठी लष्कर तैनात करायला हवं, असं एका व्यक्तीनं सूचवलं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले,’लष्कराला पाचारण करण्याची गरज नाही. लष्कर परकीयांविरुद्ध बोलवलं जातं, स्वःकियांविरुद्ध नाही. त्यामुळे सैन्य बळाला बोलावण्याची वेळ येऊ देऊन नका. दोन आठवडे धीर धरा,’ असं आवाहन पवार यांनी केलं.

शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधताना पुन्हा एकदा घरात राहण्याचं आवाहन केलं. लॉकडाउनच्या काळात लोकांनी सरकारच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण गरजेचं आहे. या काळात तुम्ही वाचन वाढवलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख या व्यक्तीचं साहित्य आणि प्रेरणादायी चरित्र वाचावी,’ अशी सूची पवारांनी तरुणांना दिली.

तसेच पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा आपण जवळपास महिना ते दीड महिना साजरा करत असतो. मात्र, आता यावेळेला हा सोहळा साजरा करण्याचा प्रसंग आहे का? याचा गांभिर्याने विचार करायची गरज आहे. आपण अनेकदा आंबेडकर जयंतीसारखा सोहळा हा तीन ते चार आठवडे साजरा करत असतो. यावेळेला थोडंस या कार्यक्रमाला पुढे नेणं शक्य आहे का? याचा विचार निश्चितपणे करायची वेळ आली आहे.

आपण सामूहिकपणे एकत्र आलो तर त्यामुळे नवीन समस्यांना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. याचा परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे स्मरण करुया. त्यांचे योगदानाचे आठवण करुया. असे आवाहनही त्यांनी केले.