अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे नक्षलवाद नव्हे – शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनुसार भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी एसआयटीमार्फत सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्राने पवारांना मोठा धक्का दिला. भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे.

केंद्रीय गृह खात्याने याबाबत राज्य सरकारला कळवलं आहे. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला. यावेळी शरद पवार म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील फेरतपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्य सरकारने पावले उचलली जात असतानाच केंद्राने याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे(NIA) दिला. वास्तविक बघता याचा तपास करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारची यंत्रणा यासाठी सक्षम आहे.

मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेलं नाही. त्यामुळे तपास होणं गरजेचं आहे; पण, त्यातून सत्य बाहेर येईल म्हणून हा या प्रकरणाचा तपास घाईघाईनं एएनआयकडे दिला, असा आरोप पवार यांनी केला आहे. एल्गार परिषदेनंतर झालेल्या अटकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे नक्षलवाद नव्हे, त्यांनी केवळ कविता वाचली होती. परिषदेत केवळ अन्यायाविरोधात तीव्र भाषण झाले. मात्र पोलिसांनी तारतम्य न ठेवता त्यांना नक्षलवादी म्हणून अटक केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत माओवादाचा उल्लेख केला नव्हता, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी फोन टॅपिंगच्या मुद्यावरही भाष्य केले. गृह खात्याला जेवढे अधिकार असतात तेवढे राज्यमंत्र्याला नसतात. त्यामुळे तत्कालीन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना याबाबतची माहिती नसावी. फोन टॅपिंगच्या मुद्द्याला कधीही गांभीर्याने घेतले नाही, असेही ते म्हणाले.