…तर, बाबरी वाचली असती; पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar

मुंबई : मागच्या महिन्यात राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला. त्यानंतर मोदी सरकारने राम मंदिर उभारणीचं काम सुरू करण्यासंदर्भात ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून, शतकभरापेक्षाही काळ चाललेल्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना गौप्यस्फोट केला. ‘उत्तर प्रदेश सरकारमधील बरखास्त केलं असतं, तर बाबरी मशीद वाचली असती,’ असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. महाराष्ट्र विधान मंडळाच्या वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने बुधवारी (११ मार्च) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिवंगत ज्येष्ठ नेते शंकराव चव्हाण, राजारामबापू पाटील, यशंवतराव मोहिते व डॉ. रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते.

या कार्यक्रमात चारही नेत्यांच्या कार्याला उजाळा देताना शरद पवार यांनी बाबरी मशीद वादावर प्रकाश टाकला. शरद पवार म्हणाले, ‘तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली बाबरी मशिदीचा वाद कसा संपुष्टात आणायचा, यासाठी समितीची स्थापन केली होती. त्यात आपण स्वत, शंकरराव चव्हाण, अर्जून सिंह व माधवसिंह सोळंकी होते. त्यावेळी बाबरी मशिद वाचवायची असेल तर, उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग सरकार बरखास्त करा, अशी सूचना चव्हाण यांनी केली होती. परंतु त्यांची ती सूचना ऐकली नाही. त्यानंतर बाबरी मशिदीचे काय झाले, त्यानंतर जातीय दंगली झाल्या हे आपणास माहित आहे. शंकराव चव्हाण यांची सूचना त्या वेळी ऐकली असती तर पुढचे अनर्थ टाळता आले असते,’ असं शरद पवार म्हणाले.