शरद पवारांनी केला अजितदादांच्या बंडाबाबत खुलासा

मुंबई : राज्यात सत्तेस्थापनेच्या घडामोडीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर घडलेल्या सत्तानाट्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय होती? हा प्रश्न विचारला जात असताना खुद्द पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ‘अजितने शपथ घेतली आहे, असे मला सुप्रियाने सकाळी 6 वाजता फोन करून सांगितले. या वेळी शपथविधी झाला होता. या गोष्टीवर माझा विश्वासच बसला नाही. सुप्रिया चांगलीच चिडलेली होती. मला तिने हे सांगितल्यावर मी लगेचच टीव्ही लावला. शपथविधीची दृश्यं पाहत असतानाच मला अजितसोबत राष्ट्रवादीचे जे लोक दिसले ते सगळेच माझ्या विश्वासातले होते. मला कळून चुकलं या सगळ्यांना माझं नाव सांगूनच तिथे नेण्यात आलं असावं…ही गोष्ट उमगल्यानंतर माझी खात्री झाली की मी अजितचं हे बंड मोडून काढू शकतो. मी लगेचच उद्धव ठाकरेंना फोन केला आणि ही स्थिती निवळेल, असा विश्वास त्यांना दिला. त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केल्याचे पवार म्हणाले.

याच मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ‘नेहरू सेंटरमधल्या बैठकीत माझी काँग्रेसच्या नेत्यांशी सत्तास्थापनेवरून नव्हे तर दुसऱ्याच एका कारणावरून वादावादी झाली. या टोकाच्या वादानंतर मी त्या बैठकीतून बाहेर पडलो. या बैठकीनंतर अजित राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांना म्हणाला, आत्ताच काँग्रेसचे नेते असे करतायत तर सत्ता स्थापन झाल्यानंतर काय होईल? त्यानंतर त्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि गटनेता म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर केल्याचे पवार म्हणाले.

तत्पूर्वी भाजपच्या नेत्यांकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करता येईल का याबद्दल विचारणा होत होती. त्यावर अजित पवारांनी, आपण भाजपशी चर्चा करूया, अशी भूमिका मांडली. त्यावर शरद पवार म्हणाले, मी त्याला सांगितले की चर्चा करायला काहीच हरकत नाही. ते काय म्हणतायत ते ऐकून घ्यावं. हे बोलणे झाल्यानंतर अजित पवारांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली हेही शरद पवारांनी सांगितलं. असं असलं तरी भाजपसोबत जाण्याला मी कधीच हिरवा कंदिल दिला नव्हता हेही त्यांनी सांगितलं.