शरद पवार ऍक्शन मोडवर, साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

Sharad Pawar

मुंबई :- सध्या राज्यात कोरोनाचा (Corona) कहर बघायला मिळत आहे. दररोज नव्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राणही गमवावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील साखर कारखान्यांना पत्र पाठवून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असून त्यांच्या सूचनेवरून राज्यातील सहकारी आणि खाजगी अशा  १९० साखर कारखान्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे; शिवाय जे कारखाने बंद आहेत त्यांनी ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं पत्र जसंच्या तसं

प्रति

अध्यक्ष / कार्यकारी संचालक

विषय : कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती व पुरवठा करण्याबाबत

महोदय,

आपणा सर्वांना माहीतच  आहे की, सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे व कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे.

सद्य:स्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरच्चंद्रजी पवारसाहेब यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहवीजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी व ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल.

ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व विजेची गरज भासते. साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती  प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत व त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळ यांचा  उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुद्धा कमी होईल.

सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे. राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे. या ठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्विंग  अॅडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरित कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे. या अनुषंगाने सर्व कारखाने आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करतील याची खात्री आहे. कळावे,

आपला विश्वास,
(शिवाजीराव देशमुख)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button