‘राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकणार’ हे ३० वर्षांपासून ऐकतोय; पवारांचा शिवसेनेला टोला

Sharad Pawar-CM Uddhav Thackeray.jpg

नाशिक :  राज्यात एकहाती शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. त्याला आता राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोचक उत्तर दिले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून राज्यात एकहाती भगवा फडकवण्याचे भाषण ऐकतोय. मात्र आतापर्यंत एकहाती भगवा फडकलाच नाही. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असे खोचक प्रत्युत्तर शरद पवार यांनी शिवसेनेला दिले आहे.

ते आज नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे सांगितले होते. २०२२ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक आहे आणि या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी मुंबईत सत्तेत येईल, असं भाकीतही शिवसेनेच्या संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढण्यावर आधी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा केली जाईल.

स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवायच्या की स्वतंत्र, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत.  त्यामुळे त्याच दिशेने काम करा, असा सल्ला देत जागावाटपाचा निर्णय यासारखे अनेक मुद्दे आहेत. सर्व मुद्द्यांवर योग्य निर्णय झाल्यास ते शक्य होईल. कोणाच्या नेतृत्वात सत्ता स्थापना होईल तो येणारा काळच ठरवेल, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे शिवसेनेचा समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER