संयमाचं श्रेय सीमावासीयांना : शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची (Maharashtra-karnataka-border-dispute) माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांची गळचेपी केली जात आहे. मात्र मराठी बांधवांनी नेहमीच संयमाची भूमिका घेतली. संयमाचे श्रेय मराठी सीमावासीयांना जाते. सीमा भागातला तरुण पिढ्यानपिढ्या यातना सहन करतोय. महाराष्ट्रात राहायचे आहे यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहेत. असेही पवार म्हणाले.

गेली अनेक वर्षे ज्या प्रश्नासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे, त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुस्तक रूपाने कायमस्वरूपी समाजासमोर कायमस्वरूपी राहावी यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. डॉ. दीपक पवार यांच्यावर जबाबदारी टाकून हा एक ग्रंथ आज आपल्या सर्वांसमोर त्यांनी सादर केला. हा ग्रंथ या चळवळीचा इतिहास सर्वांसमोर आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, तरीही या पुस्तकात काही कमतरता आहेत, असं मला वाटतं, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

सेनापती बापट यांनी उपोषण केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून निष्कर्षावर येण्यासाठी एका सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी सूचना केली. त्यामध्ये जस्टीस महाजन यांच्या नावाची शिफारस केली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सद्भावनेने न्यायावर विश्वास ठेवून इंदिरा गांधींचा प्रस्ताव मान्य केला. महाजन यांनी याबाबतचा अहवाल मांडला. मात्र, तो अहवाल १०० टक्के महाराष्ट्राच्या विरोधात होता. त्यामुळे साहजिकच एक सबंध देशात वेगळं वातावरण निर्माण झालं. मागणी महाराष्ट्राने केली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आयोग नेमण्यासाठी सहमती दिली. ती सहमती देताना अहवालाचा निकाल मान्य करू, असा शब्द दिला, असं पवार यांनी सांगितलं.

अहवाल विरोधात आल्यानंतर महाराष्ट्राने त्या अहवालास नाही म्हटलं. याचा अर्थ महाराष्ट्र भांडखोर आहे, आपल्याला हवं तेच करून घेणारे आहेत, अशा प्रकारचा समज संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न काही घटकांनी केला. त्यातील सत्य बाहेर आणण्याचं काम अंतुले यांनी केलं. माझ्या मते, अंतुले यांचं फार मोठं योगदान होतं. दीपक पवार यांच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख नाही. अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टींचा उल्लेख होण्याची गरज आहे. पण तरीही ठीक आहे. बहुसंख्य लोकांसमोर या निमित्ताने या चळवळीचा इतिहास समोर येतोय, असं मत त्यांनी मांडलं.

आपल्या काही मागण्या होत्या. त्या १०० टक्के पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी भूमिका आपण सातत्याने घेतली. त्यामुळे काही वेळेला काही भाग मिळत असताना आपण त्याचा स्वीकार केला नाही. आपण आजही निफाणीसाठी भांडतो. एका चर्चेत त्यांनी निफाणी आपल्यासाठी देऊ केली. पण सीमा भागातील सर्व मराठी भाषकांचा दृष्टीकोन होता की, आम्ही सर्व एकत्र राहू, सर्वच एकत्रपणे महाराष्ट्रात जाऊ. त्यामुळे काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांनी इतक्या संयमाच्या मार्गाने एवढी वर्षे चळवळ करावी, असा इतिहास या देशात राहिलेला नाही. त्याचं सर्व श्रेय सीमा भागातील नागरिकांना जातं. सीमा भागातील नागरिकांनी सातत्याने संघर्ष केला. काही पिढ्या या संघर्षात नष्ट झाला, असं शरद पवार म्हणाले.

मी आणि मधु मंगेश कर्णिक यांनी मिळून सर्व दाखले गोळा केले आणि ते न्यायालयात सादर केले. न्यायालयीन लढाई सुरू होती. दुसऱ्या बाजूला संघर्षही सुरुवात होता. आम्ही स्वस्थ बसलेलो नाही. महाराष्ट्राने सातत्याने सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा दिला. एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समितीची नेमणूक झाली. बाळासाहेब ठाकरे, प्राध्यापक एम. जे. पाटील असे अनेक सहकारी यामध्ये सामील झाले. सत्याग्रहाचं हत्यार पुन्हा एकदा करावं, अशी भूमिका घेतली गेली, असं त्यांनी सांगितलं.

पहिला सत्याग्रह मी करावा, नंतर सेनेच्यावतीनं छगन भुजबळ यांनी करावा, असं समितीनं सांगितलं. त्यानंतर सत्याग्रहांची मालिका सुरूच राहिली. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला फार त्रास दिला नाही. एक दिवस कुठे तरी ठेवलं. पण छगन भुजबळ यांच्यावर फार वेगळं प्रेम दाखवलं. भुजबळ वेशांतर करून तिथे गेले. नटसम्राटमध्ये कुणी काम करतंय की काय अशा पद्धतीने वेशांतर करून ते गेले. पण शेवटी एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांना ओळखलं. तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करत आहात, असा आरोप ठेवून त्यांना काही महिन्यांसाठी डांबून ठेवलं. असे अनेकांना त्या सबंध कालखंडात यातना सहन कराव्या लागल्या, असं शरद पवार म्हणाले.

आमच्या सगळ्यांच्या यातना एक-दोन दिवसांच्या असेल; पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यानपिढ्या या सगळ्या यातना सहन करतोय. मला महाराष्ट्रात राहायचंय. मला मराठी भाषिक म्हणून राहायचा अधिकार आहे. तो अधिकार मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. त्यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहे, या भूमिकेतून त्यांनी अजूनही ही सबंध चळवळ धगधगती ठेवण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी सांगितलं.

आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सुप्रीम कोर्ट आपलं शेवटचं हत्यार आहे. सुप्रीम कोर्टासाठी आपल्याला पूर्ण तयारीने आपल्या बांधवांची भूमिका मांडावी लागेल. अंतिम पर्वात उचित असा अनुकूल निर्णय कसा येईल, यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल यासाठी मुख्यमंत्री अधिक लक्ष घालत आहेत ती याची जमेची बाजू आहे. या प्रश्नासाठी महाराष्ट्र एक आहे. विरोधी पक्षदेखील आपल्या सीमा भागात नागरिकांसाठी सरकारसोबत आहे, असं शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER