लोकसभेचा अपेक्षित निकाल नाही; पण लोकांचा कौल मान्य– शरद पवार

Sharad Pawar

मुंबई :लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला अपेक्षित होता तसा निकाल आला नाही. तरी लोकांनी जे मतदान केलं त्यांचे आभार मानतो, कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांना धन्यवाद देतो. लोकांचा निर्णय मान्य आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

मागील निवडणुकीत जे यश भाजपला मिळालं होतं त्यामधील मताधिक्य यावेळी कमी झालं आहे. आमच्या पक्षातर्फे निकालांची चिंता न बाळगता दुष्काळग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत करण्याची भूमिका आहे. अनेक ठिकाणी आम्ही खूप कमी मतदानाने पराभूत झालो आहोत. याचा गांभीर्याने अभ्यास करणार आहोत, असेही पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार, असे दिसते. ५४३ पैकी ५४२ जागांवरील कल हाती आले आहेत. यात भाजपप्रणीत रालोआ ३४५ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसप्रणीत संपुआ – ८५, अन्य पक्ष – ११२ जागांवर आघाडीवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा मोदी सरकाराने ईव्हीएममध्ये फेरफार केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे .

मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करू शकलो, असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी केलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं  जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरूर, सातारा, रायगड हे मतदारसंघ  मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघांत  मतमोजणी सुरू आहे. त्या ठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो, अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाचं भूत असून  यंदा प्रथमच त्याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults