मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण मुद्दाम बनवलं जात आहे – शरद पवार

sharad pawar

राज्यात आता एक नवीन पार्टी आली आहे. वंचित बहुजन आघाडी. ही पार्टी एकीकडे सेक्युलर आहे असे सांगते तर दुसरीकडे हिंदुत्वावर स्वार असणाऱ्या भाजपला फायदा करून देते.


मुंबई : देशात यापूर्वी कधीही इतक्या टोकाचं मुस्लिमविरुद्ध वातावरण नव्हतं. मात्र अद्ययावत सरकारकडून हे वातावरण निर्माण केलं जात आहे. पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे- असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात शरद पवार बोलत होते. पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत.

देशात एक वेगळं वातावरण पसरवलं जात आहे. मॉब लिंचिंगसारखे प्रकार सर्रास घडत आहेत. यापूर्वी मी कधी ‘मॉब लिंचिंग’ हा शब्द ऐकला नव्हता. देशातच जन्मलेल्या व्यक्तीला ‘मी हिंदुस्तानी आहे’ असं बोलायला सांगितलं जात आहे. हे चित्र देशात एखाद्या समूहासमूहात भांडणं लावण्यासाठी प्रवृत्त करणारं आहे. भारत देश विविध जाती, धर्मांनी वैविध्यपूर्ण आहे. विविधतेत एकता हेच भारताचं वैशिष्ट्य राहिलं आहे; परंतु काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत, असे शरद पवार यावेळी म्हणाले. बीसीसीआयचा अध्यक्ष असताना मी पाकिस्तानमध्ये गेलो आहे. तेव्हा एक वेगळं वातावरण पाहिलंय. एक वेगळी स्थिती आज देशासमोर आली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

तसेच, राज्यात पूरस्थिती आली. ओल्या दुष्काळाने जनता हैराण झाली. जीवितहानी, मुक्या प्राण्यांची हानी झाली; परंतु देशाच्या प्रमुखांनी याची पाहणीदेखील केली नाही, असा आरोप पवार यांनी केला.

त्याचप्रमाणे, राज्यात आता एक नवीन पार्टी आली आहे. वंचित बहुजन आघाडी. ही पार्टी एकीकडे सेक्युलर आहे असं सांगते तर दुसरीकडे हिंदुत्वावर स्वार असणाऱ्या भाजपला फायदा करून देते. वंचित ज्या पद्धतीने जात आहे त्यांची नियत साफ नाही, असे चित्र आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.