शरद पवारांची नाराजी पत्करून उद्धव यांनी काय साधले?

Sharad Pawar-Uddhav Thackeray

badgeराष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार बनवले आणि तेच हे सरकार कधी तरी पाडणार. सत्तास्थापनेच्या दोन महिन्यांतच हे स्पष्ट झाले. दोन वर्षांपूर्वी एल्गार परिषद- कोरेगाव भीमा दंगल झाली होती. तिचा तपास कोणी करावा? मोदी सरकारच्या पोलिसांनी की गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पोलिसांनी? ह्यावरून आता उद्धव सरकारमध्ये ‘दंगल’ पेटली आहे. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारच्या एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास पथकाकडे द्यायला मंजुरी देऊन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी पंगा घेतला आहे.

एल्गार प्रकरणाचा तपास देवेंद्र फडणवीस सरकारचे पोलीस करीत होते. पवारांनी ह्या तपासावरच संशय व्यक्त केला आहे. एसआयटी म्हणजे विशेष तपास पथकामार्फत तपास करा, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले. तशा हालचाली सुरू असताना मोदी सरकारने चपळाई दाखवत हा तपास एनआयएकडे दिल्याने पवारांची गोची झाली. गृहमंत्री अनिल देशमुख कायद्याचा सल्ला घेण्यात गुंग असताना उद्धव ठाकरे यांनी तपास एनआयएकडे सोपवायला मंजुरी देऊन महाआघाडीत भूकंप केला. दिल्लीच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आल्यानंतर उद्धव यांनी निर्णय केल्याने ह्या सरकारचा रिमोट कंट्रोल पवारांकडून सुटल्याचे दिसत आहे.

महाआघाडीत मतभेद; पण सरकार टिकेल

पवारांचा विरोध पत्करून उद्धव यांनी काय साधले? याची चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयात जाऊन उद्धव यांना हा मामला रखडवता आला असता. पण त्यांनी चक्क थोरल्या पवारांचा ‘हुकूम’ तोडला. पवार लगेच कुणाशी खाजवत नाहीत. टायमिंग साधून ते उद्धव यांना घेरतील. एल्गारच्या तपासात राजकारण दडलेले असल्याने ते कसे वळण घेते ते पाहायचे.

मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून काम करायचे असे ठरले असताना उद्धव वेगळे वागल्याने महाआघाडीमध्ये पहिली मोठी ठिणगी पडली आहे. आग भडकायला वेळ लागणार नाही. तीन तोंडांच्या ह्या सरकारमधले मतभेद हळूहळू बाहेर यायला लागले आहेत. तिजोरीत खडखडाट असल्याने उद्धव यांनी विकासकामांना कात्री लावण्याचा सपाटा सुरू केला असताना ऊर्जामंत्री काँग्रेसचे नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत फुकट वीज देण्याचा हट्ट धरला आहे. ‘हे सरकार आपल्या ओझ्याने पडेल’ असे भाजप नेते पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. ओझे वाढायला सुरुवात झाली का? असे वाटावे असे चित्र आहे. पवार आज लगेच हा मुद्दा ताणून धरण्याच्या मूडमध्ये नाहीत. पण उद्या केव्हा तरी याच मुद्यावरून राष्ट्रवादी बाहेर पडली तर धक्का बसायला नको.