पवारांचा उठला बाजार

badgeराष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर नोटीस बोर्डवर लिहिले होते… ‘पक्षात जो कोणी शेवटी राहील त्याने पंखे, खिडक्या आणि दार बंद करून किल्ली बारामतीच्या साहेबाकडे जमा करावी.’ आहे ना गंमतीदार चुटका ! राष्ट्रवादीची अवस्था आज ह्या चुटक्यापेक्षा वेगळी नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांची युती होऊ नये म्हणून दोन्ही कॉंग्रेसचे नेते देव पाण्यात बुडवून बसले होते. पण युती होतेय. दोन काँग्रेसही
आघाडीने लढत आहेत. पण आघाडीत कोण उरलंय. आघाडी केव्हाच रिकामी झाली आहे. उरलेसुरलेही निघत आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पवार कुटुंबच काय ते उरलेले दिसेल. दोन दोन मेगाभरती होऊनही गळती थांबायचे नाव घेत नाही. २०-२५ आमदार, माजी मंत्र्यांनी आतापर्यंत युतीमध्ये उड्या मारल्या आहेत. आज नवी मुंबईचे ‘राजे’ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. नियतीचा खेळ पाहा . १० वर्षांपूर्वी भाजपला उमेदवार मिळत नव्हते. आज भाजपमध्ये ओव्हरफ्लो आहे. आयारामांना भाजप शिवसेनेत पाठवतो आहे. पवारांचा बाजार उठला आहे. पवार पॉवरचा फ्युज गेला आहे. इतरांच्या घरात फोडाफोडी करून पवारांनी साम्राज्य वाढवले. आज चक्र उलटे फिरत आहे. पवारांनी पेरले ते उगवले. ह्याच गणेश नाईक, छगन भुजबळ, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार आदींना त्याच्या पक्षातून फोडून पवारांनी आणले होते.
त्यांच्या ह्या हुशारीचे चाणक्य म्हणून मीडियाने कौतुक केले होते.

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पवार पहिले तरुण मुख्यमंत्री बनले तेव्हा ‘मीडिया ट्रायल’ झाली नाही. पण आता पवारांना प्रत्येक पक्षांतरात ‘ईडी’चा वास येतो. पवारांनी ५० वर्षे सत्तेचे राजकारण केले. त्याच सत्तेच्या हव्यासापोटी त्यांचेच चेले युतीमध्ये घुसत आहेत. त्यामागे निष्ठा, मूल्ये नाहीत. तिकडून निवडून येता येत नाही म्हणून ते इकडे आले आहेत. ५-२५ वर्षांनी कदाचित कॉंग्रेसचे चांगले दिवस कुणी आणेलही. पण तोपर्यंत वनवासात राहायची कुणाची तयारी नाही. शरद पवारांची अस्वस्थता समजू शकते. आयुष्याच्या संध्याकाळी सत्ता त्यांना वाकुल्या दाखवत आहे.
पवारांवर ही पाळी आली; कारण त्यांनी मराठा घराण्यांना मोठे केले. आबा पाटलासारखे बोटावर मोजता येतील असे नेते सोडले तर पवारांनी सुभेदारच पोसले. इतकी वर्षे ताकद देऊनही हे नेते माझ्यासोबत का नाहीत? याचे कोडे
पवारांना आता पडले असणार. पण आता खूप उशीर झाला आहे. पवार यांच्यातले गुण आतापर्यंत लोकांनी पाहिले. आता दोष उघडे पडत आहेत. दोन्ही काँग्रेस भंगारात निघत असतानाही पवार इंदापूरची जागा कॉंग्रेसला सोडायला तयार नाहीत, याला कुठला मुत्सद्दीपणा म्हणायचा? आयुष्यभर पवार हेच करत आले. पण त्यांचे दोष लोकांनी झेलले. आता जनताच हिशेब चुकता करायला पुढे येत आहे.