शरद पवारांकडून मंत्र्यांचा क्लास, मंत्र्यांकडून जाणून घेतला कामांचा लेखाजोखा

Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेनुसार अमूक तमूक मंत्र्यांचा ‘जनता दरबार’ पार पडणार आहे… असं राष्ट्रवादीकडून रोज सांगितलं जातं. त्यानुसार मंत्र्यांचा जनता दरबारही भरतो. तक्रारी ऐकून घेऊन त्याचं निराकरणही केलं जातं. गुरुवारीही जनता दरबार भरला… पण हा जनता दरबार नेहमी प्रमाणे जनतेचा नव्हता. आज मंत्र्यांनी दरबार भरवला नाही… तर चक्क शरद पवार यांनीच मंत्र्यांचा जनता दरबार घेतला. मंत्र्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या कामाचा आढावाही घेतला. त्यामुळे पवारांचा हा आगळावेगळा दरबार आज चक्क चर्चेचा विषय ठरला आहे.

पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी स्वत: शरद पवार सर्वांत आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात हजर झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक (Nawab Malik), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), अदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, खासदार श्रीनिवास पाटील असे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले आहे. आता इथून पुढच्या काही महिन्यांत महापालिका निवडणुका संपन्न होणार आहे. त्याच अनुषंगाने राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे सरकारमधील साथीदार शिवसेना आणि काँग्रेसने काही महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या रणनितीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसंच महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या शहरांची जबाबदारी कोणच्या नेत्यांवर द्यायची, यावरही विचारमंथन झाले.

राष्ट्रवादीचे मंत्री दर आठवड्याला जनता दरबार घेत असतात. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून पवारांच्या सल्ल्यानुसार मंत्री दर आठवड्याला राष्ट्रवादी भवनमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. जनता दरबाराच्या माध्यमातून थेट मंत्री महोदय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात. एकंदरित गेल्या काही महिन्यांतली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी कशी आहे?, मंत्र्यांनी गेल्या महिनभरात कोणकोणत्या समस्या सोडवल्या, त्याचे स्वरुप काय? जनता दरबारात कोणत्या समस्या अधिक मांडल्या गेल्या? त्या सोडवल्यात का? याची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली.

जनता दरबारातील समस्यांवरून राज्यातील जनतेच्या समस्या समजून येतात. राज्यात कोणते प्रश्न अधिक भेडसावत आहेत? ते कळतं. शेतकरी, तरुण, महिला, दलित आणि आदिवासी आदींच्या समस्याही समजून येतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मानसिकता आणि राज्यातील वातावरणाचा अंदाज घेणं सोपं जातं. त्यामुळेच पवारांनी मंत्र्यांचा दरबार भरवून राज्यातील वातावरण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे औरंगाबाद शहराच्या नामांतरवरुन महाराष्ट्रातराजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष भाजपने याच मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडल्या जात आहे. औरंगाबादचं नामांतर झालंच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका सेनेने घेतली आहे. तर सरकार स्थापनेवेळी तयार केलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामममध्ये हा मुद्दा नाही. त्यामुळे आमचा नामांतराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी घेतली आहे. दोन्ही पक्षांच्या भूमिका समोर असताना राष्ट्रवादीने अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. या बैठकीत याही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER