भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळणार? शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक

Bhima Koregaon case-Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती. ती बैठक नुकतीच झाली. भीमा कोरेगावच्या (Bhima Koregaon case) मुद्द्यावर चर्चेसाठी ही बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते.

आता भीमा कोरेगाव आयोगाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भीमा कोरेगाव प्रकरण अजूनही अनेकांच्या मनात ताजे आहे. या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी केला होता. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित बैठकीत शरद पवारांचे प्रमुख मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER