
बारामती :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ ते बारामती अशी ६०० किमीची (600 KM) पायपीट करून चालत आलेल्या संजय खंदारे देशमुख (Sanjay Khandare) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांच्या प्रेमाची दखल घेत त्यांना तब्बल दोन तास वेळ दिला. या वेळेत शरद पवार यांनी संजय खंदारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. ज्या नेत्यावरील प्रेमापोटी चालत आलो तो माझा विठ्ठलच मला साक्षात भेटला, अशी प्रतिक्रिया देत संजय खंदारे अक्षरश: भावुक झाले.
शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवासाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा येथून बारामतीपर्यंत पायी चालत येत संजय खंदारे यांनी शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. ही बाब संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड आणि अमोल काटे यांनी शरद पवार यांना कळवली. शरद पवार यांनी संजय खंदारे यांना भेटण्यासाठी पुण्यात मोदीबाग येथील निवासस्थानी बोलावलं आणि तब्बल दोन तास त्यांच्याशी संवाद साधला.
विदर्भातील शेतीप्रश्नासह संजय खंदारे यांच्या कुटुंबाबद्दल शरद पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या यवतमाळ ते बारामती पायी चालण्याच्या उपक्रमाबद्दल माहिती घेतली. या सर्व संवादात संजय खंदारे भावुक झाले होते. माझ्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा क्षण आहे; कारण ज्या पवारसाहेबांची कारकीर्द लहानपणापासून पाहात आलो, त्या माझ्या विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटलो. यापेक्षा मोठा आनंद तो काय? अशी प्रतिक्रिया संजय खंदारे यांनी व्यक्त केली.
ही बातमी पण वाचा : मी शरद पवारांची ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिली , पण… ; अजित पवारांची कांजूर प्रकरणी प्रतिक्रिया
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला