पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग; राज्यपाल आणि पवारांची भेट, चर्चेला उधाण

Sharad Pawar - Koshyari

मुंबई :- कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार उत्तमपणे काम करत असतानाही विरोधक मात्र सरकारच्या धोरणांवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याबाबत विरोधकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अनेकदा भेट घेत सरकारच्या कामांवर नाराजी व्यक्त करत तक्रारही केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी राज्यपालांची भेट घेत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र खुद्द राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना भेटीचं निमंत्रण पाठवले होते. पवारांनीही निमंत्रणाचं स्वीकार करत राज्यपालांची भेट घेतली.

ही बातमी पण वाचा : युपीच्या कामगारांनाही यापुढे महाराष्ट्रात येण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल – राज ठाकरे

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढतच असून, राज्यात पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. आधी भाजप नेत्यांच्या राज भवनावरील बैठका, त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं बैठकीचं आमंत्रण ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी लावलेली हजेरी, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार स्वतः संजय राऊत यांनी घेतलेली भगतसिंग कोश्यारी यांची भेट. यानंतर आज मोठी अपडेट पुन्हा पाहायला मिळाली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय साधून योग्य निर्णय घेतले जावे अशी भूमिका राज्यपालांनी घेतली असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या ३१ मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार असल्याने त्यापुढेही वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रातील दुवा म्हणून पवारांकडे बघितलं जात आहे. राज्य सरकार पुढे काय करणार याबाबतचे मत जाणून घेण्यासाठी राज्यपालांनी पवारांनानिमंत्रण दिल्याची माहिती पुढे येत आहे.

एकीकडे विरोधीपक्षनेते सतत राजभवनावर जात आहेत. अशात राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील दरी वाढताना दिसून येत आहे. अशातच नुकताच राज्यातील शेवटच्या वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा वाद निर्माण झाला. याव्यतिरिक्त येत्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांवर सरकारला प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर देखील काय होऊ शकते यावर चर्चा. आणि मुख्यत्त्वे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढताना दिसतो आहे. त्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत राज्यपालांनी शरद पवार यांना भेटीसाठी बोलावलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली. शरद पवार आणि राज्यपाल यांची केवळ सदिच्छा भेट असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर शरद पवार आणि राज्यपालांची भेट झाली नवहती. म्हणूनच आज शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं पटेल म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मेसेज आल्याच्या चर्चा देखील जोर धरतायत. अशात यामध्ये कोणताही यामध्ये कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेऊ नये असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER