पवार साहेब रमले ‘पुस्तकाच्या गावात’

सातारा : सातारा जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द असलेले भिलार हे गाव देशातले पहिले पुस्तकाचे गाव म्हणून नावारूपास आले असून, या पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाच्या गावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली. या गावात शिरताच शरद पवार काही काळ तेथील पुस्तकांत ते रमले. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पुतणी सौ. विजया पाटील, डॉ. रजनी इंदूलकर, स्नुषा सुनेत्रा पवार, सौ. निकोला पवार, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार खासगी दौऱ्यानिमित्त महाबळेश्‍वर येथे मुक्कामी आहेत. वेळात वेळ काढून आज त्यांनी पुस्तकांचे गाव भिलार येथे भेट दिली. या भेटीत त्यांनी सरपंच सौ. वंदना भिलारे व माजी आमदार, स्वातंत्र्यसैनीक भि. दा. भिलारे (गुरुजी) यांच्या पुस्तकांच्या घरांना भेट दिली. साहित्याचा प्रकार, पुस्तकांची संख्या याचबरोबर पुस्तके कशा पद्धतीने निवडली, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. मोठ्या कुतूहलाने पुस्तके हाताळली. प्रवीण भिलारे यांच्या घरातील पुस्तकांमधील एक भाकरी चुलीवरची व प्रशांत भिलारे यांच्या घरात असलेल्या ऐतिहासिक पुस्तकांची पाहणी केली. रॅकमध्ये असलेली छावा, राजा शिवछत्रपती ही पुस्तके उत्सुकतेने पाहिली. मोठ्या अभिमानाने त्याबाबतची माहिती आपल्या कुटुंबीयांना देताना कुटुंबवत्सल पवार साहेबांचे आगळेवेगळे दर्शन घडले. यानंतर हिलरेंज हायस्कूलमधील पुस्तकांच्या घरास भेट दिली. या वेळी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे यांनी पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी या संपूर्ण उपक्रमाविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

भिलारे गुरुजींच्या पुस्तकांच्या घराच्या भेटीप्रसंगी गुरुजींचे नातू प्रशांत भिलारे यांनी भिंतीवरील पवार साहेबांच्या एका फोटोकडे श्री. पवार यांचे लक्ष वेधले. फोटोकडे पाहताच त्यांनी बाळासाहेब भारदे आणि भि. दा. भिलारे गुरुजींच्या फोटोमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुरुजींच्या तब्येतीचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. प्रवीण भिलारे यांच्या घरातील भेटीप्रसंगी सौ. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय नजरेने घरातील एका फोटोचा वेध घेतला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे त्या फोटोत आहेत. ही बाब सौ. पवार यांच्या चाणाक्ष नजरेने टिपली. त्यावर प्रवीण भिलारे म्हणाले, “”आम्ही काही काळ मुंबईस्थित होतो. शिंदे आमच्या भागातील असल्याने त्यांच्याविषयी विशेष आदर आहे. मात्र, आम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत पाईक आहोत.” श्री. भिलारे यांच्या या खुलाशावरही सर्व जण हास्यात बुडून गेले.