निवडणुकीवेळी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार

Sharad Pawar

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीपुर्वी शरद पवार नगरला आले होते, तेव्हा त्यांनी नगरला औद्योगिक वसाहतीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. आमदार संग्राम जगताप यांनी युवकांचे संघटन करून याच मुद्द्यावर विधानसभेसाठी युवकांना आपलेसे केले होते. युवकांसाठी रोजगार मेळावे भरवून अनेक कंपन्यांतर्फे मुलाखती आयोजित केल्या होत्या. जगताप यानी दिलेले आश्वासनपूर्ती करण्याची आता वेळ आली असून, जगताप यांनी औद्योगिक वसाहतीतील प्रश्न सोडवून वचनपूर्ती करण्याची मागणी उद्योजकांमधून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार लक्ष घालणार असल्याने उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

नगर औद्योगिक वसाहतीमधील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी, तसेच विस्तारासाठी आमदार संग्राम जगताप यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. ‘आमी’ (उद्योजकांची संघटना) संघटनेतर्फे पुढाकार घेतला जात आहे. उद्योजकांनी मांडलेल्या प्रश्नांची यादी घेवून आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेवून त्यांना हे प्रश्न सांगितले. निवेदन देवून या प्रश्नांत लक्ष घालण्यासाठी साकडे घातले.

त्यावर पवार यांनी औद्योगिक वसाहतीतील प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. ‘आमी’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे, सुनील कानवडे, सागर निंबाळकर, सचिन काकड, मिलिंद कुलकर्णी आदींनी पवार यांना या प्रश्नांचे गांभिर्य सांगितले

नगरच्या औद्योगिक वसाहतीत मोठी कंपनी नसल्याने इतर लहान उद्योगांना चालना मिळत नाही. त्यामुळे मोठ्या कंपन्या येथे येण्यासाठी आमदार जगताप यांचे प्रय़त्न सुरूच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आयटी हब तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, काही आयटी कंपन्यांच्या शाखा नगरमध्ये सुरू होऊ शकल्या. मात्र मोठे उद्योग नगरला आल्यास रोजगार मोठ्या प्रमाणात तयार होईल, यासाठी शरद पवार यांनी विशेष प्रय़त्न करावेत, अशी मागणी आमदार जगताप यांनी पवार यांच्याकडे केली आहे