शरद पवार हे शेतक-यांचे नेते नाही तर कारखानदारांचे मालक – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar-Sharad Pawar.jpg

अकोला : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आहे. सर्वच पक्षाचे नेते प्रचारात व्यग्र आहेत.

आचारसंहितेच्या या हंगामात नेत्यांचे आपल्या विरोधकावंर वार करणे ही परंपराच बनली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यातून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. शरद पवार आणि अशोक चव्हाण हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, तर ते कारखानदारांचे मालक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच शेतकऱ्यांच्या मालाची लूट कशी होईल, हेच ते पाहतात, असा आरोपही आंबेडकरांनी आघाडीच्या या दोन नेत्यांवर केला.

ही बातमी पण वाचा:- … तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल : प्रकाश आंबेडकर

यावेळी आंबेडकरांनी उपस्थितांना या निवडणुकीत योग्य निर्णय घेण्याचंही आवाहन केलं. ते म्हणाले, “आता तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं. पाणी पाजता येत नाही. लुटणाऱ्या नेत्यांना ओळखा आणि निवडणुकीत योग्य निर्णय घ्या.” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेने 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्ममेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते. यावेळी हजारो अनुयायी सोहळ्याला उपस्थितीत होते.