‘शरद पवार संपूर्ण देशाचे नेते, केवळ साहित्य संमेलनासाठी त्यांना ‘छोटे’ करू नका’

Sharad Pawar - NCP

मुंबई :- शरद पवार (Sharad Pawar) हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत तर, ते संपूर्ण देशाचे मोठे नेते आहेत. आम्हा दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना त्यांचा मोठा आधार आहे. फक्त साहित्य संमेलनासाठी त्यांना ‘छोटे’ करू नका. तब्बल ६७ वर्षांनतर आम्ही संमेलनमागत आहोत, एक संधी आम्हाला द्या, असे आवाहन दिल्लीतील मराठीजनांनी साहित्य महामंडळाला केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचे निमित्त साधून नाशिकमध्ये यंदाचे साहित्य संमेलन आयोजित केले जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मराठी उद्योजक, डॉक्टर, प्राध्यापकांनी ‘लोकसत्ता’कडे आपली भूमिका विशद केली.

याबाबत दिल्लीतील मराठी उद्योजक अविनाश चोरडिया म्हणाले, पानिपतच्या युद्धाला २६० वर्षे झाली असून महाराष्ट्राच्या निर्मितीचेही यंदा हिरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने राजधानी दिल्लीत मायमराठीचा गजर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही सरहद या संस्थेमार्फत साहित्य महामंडळाला प्रस्ताव पाठवला होता. आमच्या प्रस्तावावर विचार होईल, अशी आमची अपेक्षा होती. परंतु महामंडळाने नाशिकलाच झुकते माप दिल्याचे व नाशिकच्या लोकहितवादी या संस्थेने शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा योग साधून संमेलनाचा प्रस्ताव पाठवल्याचे कळते. असा ‘योग’ साधण्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु पवार केवळ महाराष्ट्रापुरते नेते नाहीत तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. दिल्लीतील मराठीजन तर त्यांचे खास चाहते आहेत. त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाला संमेलनाशी जोडायचेच असेल तर ते संमेलन दिल्लीतच व्हायला हवे. यातून मराठी माणसाच्या नेतृत्वाची कीर्ती देशभर जाईल. दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरात हजारो मराठी कुटुंब राहत असून लगतच्या हरयाणामध्येही रोड मराठा ही जमात मराठीवर प्रेम करणारी आहे. संमेलन दिल्लीला मिळाले तर ते मराठीच्या इतिहासात नोंदवण्याइतपत अविस्मरणीय होईल, याची मी खात्री देतो, असेही चोरडिया यांनी स्पष्ट केले.

‘मराठीचा गजर देशभर जाईल’

साहित्य संमेलन दिल्लीत झाले तर इतर भाषिक लोकांनाही मराठीशी जोडता येईल. मराठीचा गजर देशभर होईल. राहिली गोष्ट पवारांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताची, तर हेच निमित्त साधून दिल्लीतील संमेलन होणार असेल तर तो आम्हा दिल्लीतील मराठीजनांसाठी दुग्धशर्करा योग असेल, असे दिल्लीतील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विशाल खळडकर म्हणाले.

महामंडळाकडे यंदा नाशिक व दिल्ली असे दोनच प्रस्ताव आहेत. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणी भेट देऊन आयोजनाच्या दृष्टीने जे स्थळ उत्तम असेल ते निवडावे, असे महामंडळाचीच घटना सांगते. मग, नाशिकबाबत एकतर्फी निर्णय का घेतला जातोय? महामंडळाचे पदाधिकारी करोनामुळे कदाचित दिल्लीत यायचे टाळत असतील तर त्यांनी आणखी काही कालावधी जाऊ द्यावा. पण, किमान दिल्लीला एकदा भेट द्यावी. संमेलन काही नेत्याला ‘भेट’ देण्याची वस्तू नाही. हा मायमराठीचा उत्सव आणि आपल्या संस्कृती संवर्धनाचा सोहळा आहे. त्यामुळे जिथे मराठी नाही तिथे ती संमेलनाच्या निमित्ताने पोहचत असेल तर महामंडळाने या संधीचा नक्कीच विचार करायला हवा, अशी मागणी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केली.

ही बातमी पण वाचा : ८० वर्षांच्या शरद पवारांची क्रेझ, पक्षात येणाऱ्या युवकांच्या संख्येत मोठी वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER