शरद पवार राष्ट्रीय नाहीत, फक्त बारामतीचे नेते – प्रकाश आंबेडकर

Ambedkar-pawar

सोलापूर :- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं काॅंग्रेस आघाडीच्या तुलनेत मतांच्या संख्येत बाजी मारली आहे. विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच ख-या अर्थानं विरोधकाची भूमिका बजावेल असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार राष्ट्रीय नेते असल्याचे जनमानसात प्रख्यात असले तरी हा केवळ भास असून ते कोणत्याही बाजूने राष्ट्रीय नेते वाटत नाहीत. तर फक्त बारामतीचे नेते आहेत, असा टोला आंबेडकरांनी पवारांना लगावला आहे. सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

वंचितवर भाजपची ब टीम असल्याचा आरोप होतो, यावर आंबेडकर म्हणाले की, मी सुपारी घेतल्याचा ज्यांनी आरोप केला, ते काहीही सिद्ध करू शकले नाहीत. माझ्यावर आरोप करणारेच आरोपी आहेत. आम्हाला जनतेने स्वीकारले आहे. आम्ही आता विधानसभेची तयारी करत आहोत. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच प्रमुख विरोधक आहोत. वंचित आघाडी मुख्य राजकीय पक्ष असेल. सत्तेच्या नादात काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेचे विघटन केले आहे. त्यांना पुन्हा संघटना उभा करायची असेल तर दोघांनी वेगवेगळे लढले पाहिजे, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : निवडणूक हरलेल्या प्रकाश आंबेडकरांसोबत आमचे आमदार कसे जाणार? – राष्ट्रवादी

तसंच, मुस्लिम मतांबाबत ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला काँग्रेसची मते मिळाली नाहीत. शेवटच्या क्षणी मुस्लिम लोक आमच्याकडून निसटले. मौलवींनी फतवे काढले, प्रसिद्धी माध्यमाचा वापर केल्यामुळे काही मते ही विरोधकांना गेली. मुस्लिम समाज आणखी आमच्याबरोबर आला तर आम्ही ३० टक्क्यांवर येऊन पोहचू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.