शरद पवार फिल्डवरचे नेते; दुष्काळावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

sharad-pawar-is-ground-leader-said-supriya-sule-devendra-fadnavis

पुणे : राज्यात ठिकठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे . त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दुष्काळग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत. त्यावरून ”शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत, म्हणून ते फिल्डवर असतात. काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

ही बातमी पण वाचा:– आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पवार म्हणाले, ‘तुम्ही कर्ज फेडू नका मी बघतो’!

मुख्यमंत्री सध्या मंत्रालयात बसून राज्यभरातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत आहेत. त्यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच सुप्रिया यांनी ईव्हीएमविषयी शरद पवार यांनी घेतलेल्या संशयाबाबत  मत व्यक्त केले. आम्हाला ईव्हीएम नकोच, अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द ‘पारदर्शक’ आहे.  पारदर्शकता हवी असेल तर ईव्हीएम नको , असे त्या म्हणाल्या.

दरम्यान राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत भीषण झाली असून बरीच धरणं तळाला गेली आहेत. चारा व पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविल्या जात असूनही दुष्काळाचा सामना करण्यास ते मागे पडत आहे. मुंबईत बसण्यापेक्षा माझ्यासारखे दुष्काळी भागाचे दौरे करावेत. तरच दुष्काळाची खरी परिस्थिती समजून येईल. मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही. मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला होता.

शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी साताऱ्यात दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर सडकून टीका केली होती.