शरद पवार राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेते ; रावसाहेब दानवेंनी सांगितले भेटीचे कारण

मुंबई : भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीची चर्चा ताजी असतानाच दानवे यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांचीदेखील भेट घेतली.

एरवी अनेक सभा, कार्यक्रम, भाषणांमधून दानवे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. लॉकडाऊन काळात एकदाच शेतात पत्नीसह चुलीवर स्वयंपाक कराताना दिसले. त्यानंतर दानवे माध्यमांमध्ये फारसे दिसले नाहीत. आता थेट त्यांनी एकाच वेळी पवार आणि राऊत यांची बेट घेतल्याने दानवे पुन्हा चर्चेत आले आहेत.

या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून रावसाहेब दानवे यांनी मात्र यामागे कोणतंही राजकीय कारण नव्हतं असं सांगितलं आहे. साखर आणि कांदा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण शरद पवारांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलं असून संजय राऊत यांच्यासोबत कोरोनावर चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण दिले.

रावसाहेब दानवेंनी सांगितले पवार भेटीचे कारण –

ते म्हमाले, “राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कारखान्यांचे अकाऊंट एनपीएमध्ये गेले आहेत. अशा परिस्थितीत हे कारखाने सुरु करण्यासाठी बँका पैसे उपलब्ध करुन देण्यास तयार नाहीत. ऊसाचं पीक यावर्षी मोठ्या प्रमाणात आलं आहे. पुढच्या काळात शेतकरी अडचणीत येऊ नये. त्याचा संपूर्ण ऊस गाळला जावा यासाठी बँकांशी काय चर्चा करता येईल? राज्य सरकारने काय केलं पाहिजे? केंद्र सरकारच्या नेत्यांना भेटून काही करता येईल का? या विषयावर माझी आणि पवारांची चर्चा झाली”.

तसेच शेतक-यांच्या प्रश्नांसंबंधी मोदींची वेळ मागितली असून त्यानंतर भेटीचं स्वरुप ठरवलं जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

दानवे म्हणाले, “शरद पवार राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मंत्री असलो तरी सभागृहात, राज्यात गेली २५ वर्ष आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यामुळे विचारांची देवाण घेवणा होते. काही अडचण आल्यास चर्चा करतो. साखर कारखान्यांची समस्या आल्यानंतर शरद पवारांनी अनेकदा मला बोलावलं आहे. या महिन्यात मला तीन फोन आले. साखरेचे प्रश्न निर्माण झाले आहेत चर्चा करुयात असं त्यांनी सांगितलं. यासाठीच मी गेलो होतो,” असा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर बोलताना रावसाहेब दानवेंनी म्हटलं की, “दारात उभं राहिल्यावर दिसतो एवढी आमची घऱं जवळ आहेत. यावेळी आपण चहा घ्यायला या असं बोलत असतो. करोना सोडून कोणत्याही विषयावर आमच्यात चर्चा झाली नाही”. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER