शरद पवार हे सोनिया गांधींच्या बरोबरीचे नेते, त्यांचा विचार होऊ शकतो – संजय राऊत

Sanjay Raut Sharad Pawar

मुंबई :- देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाहीय. भाजपची तानाशाही सुरू आहे. या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याबरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा अशी नाही, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्राकडून कुठलंही पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहेच, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी हीच परिस्थीत आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले. आता काही निवडणुका नाहीत. पण मोदींच्या विरोधात विरोधकांनी एकत्र आलंच पाहिजे. अनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढून सत्तेत आले आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत. हे पक्ष यूपीएचा भाग नाहीत. त्या सर्वांनी यूपीएत आलं पाहिजे, असं ते म्हणाले.

यूपीएची ताकद वाढणे गरजेचं

आज सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष्या आहेत. एवढ्या वर्षांपासून त्या आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र यूपीएची ताकद वाढणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त पक्षांनी यूपीएत येऊन मोदींच्या तानाशाहीला रोखण्याची गरज आहे, असं सांगतानाच विरोधी पक्ष कमजोर होणे म्हणजे लोकशाही खतम होणे असं आहे. ममता बॅनर्जी चांगला लढा देत आहेत. त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे, असेही राऊत म्हणाले.

यावेळी यूपीएचं नेतृत्व कोण करू शकतं? असा सवाल राऊत यांना विचारला असता त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं. या देशात नेत्यांची कमी नाही. झाडाला एक दगड मारले तर राष्ट्रीय स्तरावरचे 17 नेते पडतील. एकेकाळी सर्वजण सोनिया गांधींच्या नेतृत्वात एकत्र आले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातही आले होते. देशात सोनिया गांधींच्याबरोबरीने शरद पवार हे सर्व मान्यता असलेले नेते आहेत. पवारही मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएवरही टीका केली. एनडीएत आता कोणी नाही. आम्हीही नाही. अकाली दलही बाहेर पडला आहे. बिहारमधील वातावरण पाहता उद्या नितीशकुमारही बाहेर पडतील, असं सांगतानाच एनडीए म्हणजे माचिसचा रिकामा डबा आहे, अशी टीका त्यांनी केली. एनडीएत कोण आहे, याचं संशोधन करावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. जे विरोधात आहेत आणि ज्यांच्याशी राजकीय सामना केला जात नाही, अशा लोकांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न कराल तर तसं होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्यानंतर काँग्रेस अस्वस्थ, वरिष्ठ नेत्याने दिला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER