शरद पवार शेतकरी नेते, ते शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचारही करणार नाही – संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar

मुंबई :- केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या भारत बंदला शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उद्याचा बंद राजकीय बंद नाही. लॉकडाऊनच्या काळात देशातील सर्व जनता घरात बसली असताना अन्नदाता शेतकरी शेतात राबत होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी या बंदमध्ये सहभाग घ्यावा. शिवसेनेनेही हीच भूमिका घेतली आहे. शिवसेना (Shivsena) अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे. उदयाच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

देशातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला शिवसेनेचं समर्थन आहे. शेतकरी आपला अन्नदाता असल्याने त्यांच्याप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळेच देशातील जनतेनं स्वयंस्फूर्तीनं शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत काल अकाली दलाच्या नेत्यांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना आपल्या पाठीमागे असल्याचे सांगितले आहे, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतायत? कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करणारे पत्र व्हायरल

देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शरद पवार केंद्रीय कृषीमंत्रीपदी असताना APMC कायद्यांमधील बदलांसाठी आग्रही होते. पवारांनी या कायद्यामध्ये संशोधनाची गरज व्यक्त करणारे पत्र वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांना दिले होते याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, कृषी, आणि सहकार क्षेत्रात शरद पवार त्यांच्याइतका अनुभव कोणालाही नाही. २०१० सालची परिस्थिती वेगळी होती. आज २०२० आहे. ते शेतकरी नेते आहेत. ते कधीही शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेऊ शकत नाही. ते शेतकऱ्यांशी दगाफटका करुच शकत नाही. ज्यांनी हे पत्रउकरुन काढले आहे, त्यांनी थेट पवारांशी चर्चा करावी. तसेही शरद पवार याबाबत स्पष्टीकरण देतील, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER