शरद पवार हे राज्यात पुन्हा सक्रिय ; सत्तेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे गेल्याची चर्चा

Sharad Pawar

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचे संकट वाढतच चालले आहे . यापार्श्वभूमीवर निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि राजकीय परिस्थिती याचा अंदाज आल्याने अनुभवी शरद पवार हे राज्यात पुन्हा सक्रिय झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सत्तेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे गेला अशी चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं सर्व कौशल्य आणि अनुभव पणाला लावत राज्यात अशक्य वाटणारी गोष्ट शक्य केली आणि शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आणलं. त्यामुळे शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.

राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध अधिक शिथिल करण्याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद कायम असल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात जास्तीत जास्त सवलती देण्याची मागणी राष्ट्रवादीकडून केली जात असली तरी मुख्यमंत्री मात्र कठोर निर्बंध कायम ठेवण्यावर ठाम असल्याचे समजते.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री चर्चा झाली. मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दुकाने काही काळ उघडण्यास परवानगी द्यावी, तसेच उद्योगधंदे सुरू व्हावेत, अशी पवारांची भूमिका आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, अशी पवारांची मागणी असल्याचे समजते.

सध्या राज्यात कोरोनामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण झालीय. त्यात महाविकास आघाडीतही सर्वच काही आलबेल नाही हेही स्पष्ट झालंय. त्यामुळे शरद पवारांनी सूत्र पुन्हा एकदा आपल्या हातात घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER