शरद पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश: देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘होय, आहे मी ब्राम्हण’. मी जातीनं ब्राम्हण आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. परंतु शरद पवार यांना वारंवार माझ्या जातीचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना जोरदार टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणूक पुर्वी फडणवीसांनी पवारांना मात देत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ, श्रेष्ठांना भाजपमध्ये वळते करण्यात त्यांना मोठे यश आले होते. ही निवडणूक एकतर्फी होतेय असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर पक्षाची झालेली वाताहत पाहून शरद पवार स्वतः मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना या प्रचारात स्वतः उतरण्यास पवारांच्या राजकीय वय वर्षांचे असणा-या फडणवीसांनी त्यांना भाग पाडले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पूढे फडणवीस विरूद्ध पवार अशीच निवडणूक रंगली.

अखेर पवारांचे धूर्त राजकारण त्याला शिवसेनेनी साथ दिल्यामुळे भाजप राज्यात क्रमांक एक चा पक्ष ठरूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मात्र, विरोधक देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत. ‘मी पुन्हा येईन” या त्यांच्या विधानालाही विरोधकांनी टीकेचे रूप दिले.

एवढेच नाही तर फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यात ‘अहंकराचा दर्प’ होता असे शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच विरोधकांकडून फडणवीसांच्या ”ब्राम्हण” असण्यावरूनही टीका करण्य़ात येते. मात्र, लोकसत्ता डॉट कॉमच्य़ा मुलाखतीत फडणवीसांनी जातीचे राजकारण करणा-या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शरद पवारांच्या सत्तेचा गर्व चढला होता या विधानालाही फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

मुलाखत : “जिल्हा परिषदा असो किंवा महानगर पालिका निवडणुका असो गेल्या पाच वर्षामध्ये राष्ट्रवादीचा पाया तुम्ही राज्यामधून जवळपास उखडून टाकला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणून शरद पवारांनी त्यांनी आपल्या टीकेतून कुठेतरी तुमच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे असं वाटतं का?,”

देवेद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही फडणवीस म्हणून एक फार बोलक्या प्रकारचा शब्द वापरला आहे. पाच वर्षामध्ये मी काय केलं, काय नाही केलं किंवा मी नेता झालो की नाही झालो किंवा मला लोकं मानतात की नाही मानतात हे ठाऊक नाही. पण माझ्या नेतृत्वाचं एकच यश आहे ते म्हणजे पवारसाहेब हे पुरोगामी नेते असूनही त्यांना प्रत्येक वेळी माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते. ते थेट उल्लेख करु शकत नाही पण अप्रत्यक्षरित्या अनेकदा त्यांना माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते हे माझं यश आहे.

हो आहे मी ब्राह्मण. संपूर्ण दुनियेला माहितीय मी ब्राह्मण आहे. त्यामुळेच त्यांना माझ्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची नाही पण प्रत्येक वेळेस जातीची आठवण जरुर करु द्यावी लागते,” असा टोला फडणवीस यांनी प्रश्नाचे उत्तर देताना लगावला.

“आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्येही पवारांनी अप्रत्यक्षपणे जातीची आठवण करुन दिली. लोकांनी मला आहे तसं स्वीकारलं आहे. मला खरोखर असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय पटावर मी निश्चित माझं काहीतरी स्थान मिळवलं असेल, अन्यथा वारंवार अडून अडून मी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज पवारसाहेबांना तरी पडली नसती,” असंही फडणवीस म्हणाले.

“पवारच नाही तर माझ्या जातीचा उल्लेख बऱ्याच लोकांनी केला. आमच्या विरोधांची आयुधं संपतात तेव्हा ते जातीवर येतात. माझं मत असं आहे की ‘जात’ नेत्यांच्या मनात असते ती जनतेच्या मनात नसते,” असंही ते म्हणाले.

तसेच सत्तेचा गर्व या टीकेवरुन पवारांना उत्तर देताना फडणवीस यांनी, “आम्ही ज्या ठिकाणाहून आलो आहोत ते पाहता सत्ता आमच्या डोक्यात जाऊ शकत नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.

Source:Loksatta