शरद पवारांचे नातवाला ड्रायव्हिंगचे धडे; सुप्रिया सुळेंचा आनंद द्विगुणित

Sharad Pawar - Vijay Sule - Driving Lessons

मुंबई : राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक आनंदात इतरांना सहभागी करून घेताना दिसतात. यावेळी त्यांनी सुपुत्र विजय सुळे (Vijay Sule) यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याचा व्हिडीओ शेअर केला. विशेष म्हणजे आपल्या मुलाला त्याचे आजोबा म्हणजेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ड्रायव्हिंग धडे देत असल्याने आनंद व्यक्त केला.

विजय सुळे यांनी मातोश्री सुप्रिया सुळे आणि आजोबा अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पहिल्यांदा ड्राईव्हवर नेले. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून नातवाच्या ड्रायव्हिंगचा आनंद घेत आहेत, तर मध्येच नातवाला ते ड्रायव्हिंगचे धडे देतानाही दिसून येत आहे. सुप्रिया सुळे यांनी मागे बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला.

“आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो. आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे. ” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“हळूहळू, हॉर्न उगाच वाजवू नका, स्पीड लिमिट काय माहीत आहे न?” अशा काही सूचनाही सुप्रिया सुळे लेकाला करताना ऐकू येतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या ड्रायव्हिंगचे धडे देताना आजोबा सख्ख्या नातवालाही ‘राजकीय स्टिअरिंग’ हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

“सगळ्यांना छोट्या वाटत असल्या तरी आईसाठी मोठ्या गोष्टी असतात. इट्स अ स्पेशल मुमेंट फॉर अस.” असे सुप्रिया सुळे यांनी दीड मिनिटांच्या फेसबुक लाईव्हमध्ये अखेरीस म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
MT LIKE OUR PAGE FOOTER