महाविकास आघाडीत पवारांचं वर्चस्व, राज्यसभेची चौथी जागाही राष्ट्रवादीच्या वाट्याला

Sharad Pawar

मुंबई : राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाराष्ट्र विकास आघाडीमधील तिढा अखेर सुटलेला आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीही शरद पवारांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं. काँग्रेसने चौथ्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. महाराष्ट्रामधल्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून फौजिया खान उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत. चौथ्या जागेबाबत काँग्रेस अडून बसली होती, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अखेरीस हा वाद संपुष्टात आला. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादीकडून फौजिया खान आणि शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आज अर्ज भरणार आहेत. यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असून २६ मार्चला केवळ मतदानाची औपचारिकता केवळ बाकी असणार आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या २६ मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर२६ मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२० रोजी संपत आहे.