मुख्यमंत्र्यांनी संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल – शरद पवार

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar
  • शिवसेनेला भाजपपासून दूर करण्यास शरद पवारांची राजकीय चाल यशस्वी, त्यांनीच केला खुलासा.
  • भाजपात व शिवसेनेत हे अंतर वाढावं यासाठी आम्ही जाणीवपूर्वक पावले टाकली हे मी कबूल करतो
  • सरकारस्थापनेच्या घडामोडीदरम्यान मी पंतप्रधानांना पार्लमेंटमध्ये भेटण्यास गेलो तेव्हा एक गृहस्थ सोबत होते त्यांच नाव संजय राऊत.
  • सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत व कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रारच नाही.
  • संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर सरकार अडचणीत असल्याची चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही.

मुंबई :- शिवसेनेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष आणि महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांची प्रदिर्घ मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा आज तिसरा आणि शेवटचा भाग प्रसिद्ध झाला आहे.

शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये असे मनापासून वाटत होते. त्यामुळेच आपण 2014 मध्ये भाजपाला बाहेरून पाठींबा देण्याचे विधान केले होते. असा गौप्यस्पोट शरद पवार यांनी मुलाखतीच्या शेवटच्या भागात केला आहे. तसेच, 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळीही पंतप्रधान आणि माझे संबंध चांगले आहेत. या जोरावर शिवसेनेला बाजूला करून राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपासोबत येण्याची ऑफर होती. एकदा, दोनदा नाही तीनदा भाजपाचे नेते आमच्याशी बोलत होते. असेही पवारांनी सांगितले आहे.

तसेच, ऑपरेशन कमळ विषयी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वार विश्वास दाखवत महाविकास आघाडी हे तीन पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल असे शरद पवार म्हणालेत. ऑपरेशन कमळ काय आहे? या प्रश्नाच्या उत्त्रात त्यांनी हे विधान केले आहे.

काँग्रेसचे जे नेते राज्य मंत्रिमंडळात आहेत, त्यांची अशी पहिली तक्रार आहे की, समन्वयाचा अभाव आहे. त्यांची दुसरी तक्रार अशी आहे की, राष्ट्रवादीला झुकतं माप मिळतंय सरकारमध्ये…

– एक गोष्ट खरी आहे की, उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे, जी मी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये मी अनेक वर्षांपासून पाहतो, अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून. आदेश येतो आणि तो आदेश आल्यानंतर चर्चासुद्धा होत नसते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आम्ही ज्या विचाराने वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मतांचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही आणि समजा एखादं मत मांडलं तर त्यावर आम्ही चर्चा करू शकतो. ही आमच्या कार्यकारिणीच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहानथोर सगळ्यांच्यामध्ये आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत व कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रारच नाही.

मग तुम्हाला काही अडचणी दिसत आहेत काय?

– अडचण अजिबात नाही. सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकटय़ाचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा. संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही.

संवाद पाहिजे.

– होय… तो तर हवाच!

अनेक ठिकाणी वाचतो किंवा काँग्रेसचे काही मंत्री जाहीरपणे बोलतात की, प्रशासनामध्ये थोडी अस्वस्थता आहे किंवा सरकार चालवण्यामध्ये प्रशासनाचा जास्त जोर आहे. बाळासाहेब त्याला नोकरशाही म्हणायचे, लाल फीतशाही… असं आपल्याला जाणवतं का?

– नाही… आता कसं आहे माहितेय का… हा जो कोरोनाचा काळ होता ना… म्हणजे अजूनही संपला असं नाही. या काळामध्ये हे चॅलेंज होतं… आव्हानच होतं आणि या आव्हानामध्ये बाकीचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून या कोरोनाचा सामना करायचा हे आव्हान मुख्यमंत्र्यांपुढे होतं आणि त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्यावर ही जबाबदारी जास्त होती आणि आता आपण एकत्रित रात्रंदिवस प्रयत्न करून कोरोनाचे युद्ध जिंकलेच पाहिजे ही भूमिका आहे आणि या भूमिकेला सगळ्यांचाच पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे एकतर संवाद किंवा कामाच्या पद्धती या सगळ्या गोष्टींच्यामुळे थोडं थोडं परकोलेट होतंय ही गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ ते कायमच राहील असे वाटत नाही. प्रशासन यंत्रणेची आज त्यासाठी मदत घेतली आणि ती घेण्याची आवश्यकताही होती. आता मनोहर जोशींचे सरकार, तेही मुख्यमंत्री शिवसेनेचे होते. तेव्हा कधी अशी चर्चा झाली नाही. त्यावेळी मनोहर जोशींच्या काळात शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता शिवसेना आणि भाजपच्या ऐवजी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं सरकार आहे आणि त्यामुळे मनोहर जोशींच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं तसे इथेही सरकार चालवलं जाईलच, पण आज चॅलेंज आहे ते कोरोनाचं. हे ऑपरेशन कमळ काय आहे?*

– ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डीस्टॅबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं.

महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन कमळ होईल असं सातत्यानं पसरवलं जातंय…

– पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते.. नंतर आता सहा महिने झाले… आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा करतायेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन कमळ असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही. असे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन गंभीर आरोप आपल्यावर केले मधल्या काळात. ते म्हणतात हा गौप्यस्फोट आहे. त्यात त्यांनी जो पहिला आरोप केला की, 2014 साली तुम्हाला भाजपबरोबर सरकार बनवायचं होतंच. सुरुवातीच्या काळात, तुम्ही पाठिंबा जाहीर केलात. त्यानंतर सरकार शिवसेनेबरोबर बनलं हे खरं, पण मधल्या काळात तुम्ही आणि भाजपचे वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करीत होते असे त्यांनी ठामपणे परवा सांगितलेलं आहे.

– त्यांनी सांगितलं… माझ्याही वाचनात आलं, पण गंमत अशी आहे की, हे त्यावेळी कुठे होते हे मला माहीत नाही. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यांचं काय स्थान होतं? हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहीत झाले. त्याच्या आधी विरोधी पक्षातला जागरुक आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता. पण सबंध राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वामध्ये बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये एकदा मी कॉन्शिअसली स्टेटमेंट केलं ते शिवसेना आणि भाजपचे सरकार बनू नये म्हणून…

हे कशासाठी केलंत?

– माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. हे घडलं नाही… त्यांनी सरकार बनवलं आणि चालवलं.. त्याच्याबद्दल वाद नाही, पण आमचा हा सतत प्रयत्न होता की, भाजपच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. का? दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात… राज्याची सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच मुळात त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे ते आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आमची ही एक राजकीय चाल होती.

बरं… म्हणजे फडणवीस जे सांगतात ते आपल्याला मान्य नाही…

– अजिबात मान्य नाही.. पण त्यांच्यात व शिवसेनेत हे अंतर वाढावं यासाठी आम्ही जाणीवपूर्वक पावले टाकली हे मी कबूल करतो.

ते अंतर तर आता वाढलं.. दुसरा आरोप त्यांनी असा केला की, 2019 चं जे तीन पक्षांचं सरकार आता बनलेलं आहे, त्या सरकार स्थापनेच्या दरम्यानसुद्धा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असा त्यांनी उल्लेख केलाय, तेच भाजपबरोबर सरकार बनवण्यासंदर्भात अंतिम टप्प्यात चर्चा करत राहिले आणि नंतर पवार साहेबांनी यू-टर्न घेतला. अचानक.

– नाही. हे बरोबर नाही. साधी,सरळ गोष्ट आहे की, शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱयांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही… दोनदा नाही… तीनदा बोलले… आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की, प्राईम मिनिस्टरचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला. आणि त्या वेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्र्यांकडे आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लमेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना मी सांगून गेलो की, हे मी त्यांना (पंतप्रधानांना) सांगायला जातोय. मी परत आलो त्यावेळी राऊत तिथेच होते. त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER